लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 13:34 IST2025-05-13T13:34:14+5:302025-05-13T13:34:48+5:30
पाच दिवस व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला.

लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील खुजनेर शहरात नायट्रोजन धुराचा वापर करण्यात आलेल्या एका इव्हेंटमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या भयंकर घटनेनंतर कुटुंब आणि स्थानिक लोक अशा धोकादायक इव्हेंटवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. ६ मे रोजी ही घटना घडली.
लग्न समारंभात नवरा-नवरीच्या एन्ट्रीसाठी नायट्रोजन धुराच्या पदार्थाने भरलेलं एक भांडं इव्हेंट मॅनेजरने ठेवलं होतं, जेणेकरून धुरामध्ये फोटो सेशन करता येईल. याच दरम्यान लग्नासाठी आलेली बाढगावची वाहिनी गुप्ता त्या भांड्यात पडली आणि ८० टक्के भाजली. तिला ताबडतोब स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले, त्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला इंदूरमधील अरबिंदो रुग्णालयात रेफर करण्यात आलं. पाच दिवस व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला.
वाहिनीचे वडील राजेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही कुटुंबासह एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेलो होतो. तिथे केमिकलने भरलेलं एक भांडं होतं. वाहिनी खेळत असताना अचानक त्यात पडली. प्राथमिक उपचारानंतर आम्ही तिला इंदूरला नेलं, पण तिला वाचवता आलं नाही." नायट्रोजनसारख्या धोकादायक केमिकल्सचा वापर थांबवावा अशी मागणी त्यांनी केली.
मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबाने वाहिनीचे नेत्रदान करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या दुःखद घटनेने स्थानिक लोकांना धक्का बसला आहे. लग्न समारंभात कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांशिवाय नायट्रोजनसारखं धोकादायक केमिकल कसं वापरलं जातं? आणि प्रशासन याकडे का लक्ष देत नाही? असे प्रश्न आता लोक विचारत आहेत.