'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 21:33 IST2025-04-16T21:29:08+5:302025-04-16T21:33:10+5:30

गाझियाबादमध्ये एका व्यक्तीने पत्नीची हत्या करुन स्वतःवर गोळी झाडल्याची घटना घडली.

Ghaziabad Crime Husband end his life after shooting his wife | 'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले

'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले

Ghaziabad Crime: गाझियाबादमध्ये एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. गाझियाबादमध्ये एका प्रॉपर्टी डीलरने त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केली, त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरून अर्ध्या पानाची सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये आत्महत्येचा खुलासा करण्यात आला आहे. आपल्याला कर्करोग झालाय असा खुलासा करत पतीने हे टोकाचं पाऊल उचललं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

बुधवारी गाझियाबादच्या नंदग्राम येथील राधा कुंज-२ कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. मूळचे मेरठ जिल्ह्यातील बिजौली गावातील रहिवासी असलेल्या कुलदीप त्यागीने आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने पत्नी निशु त्यागीची गोळ्या घालून हत्या केली. मग त्याने स्वतःलाही गोळी मारली. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घरातल्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी बोलवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली, ज्यामध्ये कुलदीप त्यागीने आत्महत्या करण्यामागील कारण लिहिले होते.

बुधवारी सकाळी कुलदीपने आधी पत्नी निशू त्यागी हिच्या कपाळावर गोळी झाडून तिची घरात हत्या केली. यानंतर, त्याने घराच्या मंदिरात परवानाधारक रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. सकाळी कुलदीप त्यागी आणि पत्नी त्यांच्या खोलीत होते. त्यांचा मोठा मुलगा कामावर गेला होता आणि त्याचे वडील आणि दुसरा मुलगा दुसऱ्या खोलीत होते. अचानक कुलदीप त्यागीने त्याच्या पत्नीवर गोळी झाडली. त्यामुळे ती रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडली. गोळीचा आवाज ऐकताच त्याचा मुलगा घटनास्थळी धावत आला. तितक्यातच, कुलदीपनेही स्वतःवरही गोळी झाडली. कुलदीपचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मुलगा आईला मरियम रुग्णालयात घेऊन गेला. मात्र डॉक्टरांनी तिलाही मृत घोषित केले. 

दरम्यान, सुसाईड नोटमध्ये कुलदीप त्यागीने तो कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होता असं म्हटलं आहे. त्याच्या या आजाराची कुटुंबाला माहिती नव्हती. कुलदीपला त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येईल असे वाटत होते. त्यामुळे कुटुंबावर मोठा भार पडला असता. याच तणावाखाली येऊन कुलदीपने हे टोकाचे पाऊल उचल्याचे सुसाईड नोटमधून समोर आले आहे.  मी आणि माझ्या पत्नीने आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली होती, असेही त्या चिठ्ठीमध्ये म्हटलं. त्यामुळे आधी कुलदीपने पत्नीची हत्या केली.

Web Title: Ghaziabad Crime Husband end his life after shooting his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.