गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:04 IST2025-11-19T15:01:37+5:302025-11-19T15:04:11+5:30
Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेला तसेच एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत समावेश असेला गँगस्टर अनमोल बिश्नोई हा अखेर तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे.

गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेला तसेच एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत समावेश असेला गँगस्टर अनमोल बिश्नोई हा अखेर तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आलेल्या अनमोलला बुधवारी सकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. विमानातून उतरताच अनमोल याला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले. आता त्याला थेट पतियाळा हाऊस कोर्टात नेलं जाणार आहे.
अनमोल बिश्नोई याच्यावर बाबा सिद्दिकी हत्याकांड, सिद्धू मुसेवाला हत्याकांड आणि अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार अशा अनेक हायप्रोफाईल गुन्ह्यांचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनमोल बिश्नोई हा २०२२ मध्ये बनावट पासपोर्टच्या मदतीने भारतातून फरार झाला होता. त्यानंतर नेपाळ, दुबई, केनिया असा फिरत फिरत तो अमेरिकेत पोहोचला होता. तिथून तो कॅनडामध्ये ये जा करत होता. दरम्यान, गतवर्षी अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने त्याला कॅलिफोर्नियामधून ताब्यात घेतले. तेव्हापासून तो स्थानिक पोलिसांच्या कैदेत होता.
दरम्यान, मंगळवारी अमेरिकेतील होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटने २०० जणांना भारतात डिपोर्ट केलं आहे. त्यामध्ये अनमोल बिश्नोई याचाही समावेश आहे. भारतात पाठवण्यात आलेल्यांमध्ये १९७ बेकायदेशीर वास्तव्य करणारे नागरिक तर दोन कुख्यात गुन्हेगारांचा समावेश होता.