अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:12 IST2025-11-18T17:10:28+5:302025-11-18T17:12:16+5:30
दिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासणीत तपास यंत्रणांना अल-फलाह विद्यापीठातील डॉक्टरांच्या एका दहशतवादी मॉड्यूलबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे.

अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
दिल्लीस्फोट प्रकरणाच्या तपासणीत तपास यंत्रणांना अल-फलाह विद्यापीठातील डॉक्टरांच्या एका दहशतवादी मॉड्यूलबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे. या मॉड्यूलमध्ये सामील असलेल्या प्रत्येक दहशतवाद्याची भूमिका, काम आणि कथा वेगळी होती, पण त्यांचा उद्देश मात्र एकच होता. हे डॉक्टर मॉड्यूल कसे कार्यरत होते आणि कोणत्या सदस्यावर कोणती जबाबदारी होती, याचा सविस्तर प्लॅन उघड झाला आहे.
प्रत्येक भूमिकेचा सविस्तर उलगडा
या मॉड्यूलमध्ये सामील असलेल्या प्रमुख सदस्यांचे कार्य आणि त्यांच्या भूमिका..
मौलवी इरफान अहमद: कट्टरतावादी मास्टरमाईंड
हा शोपियां येथील एका मशिदीत मौलवी होता. त्याचे मुख्य काम म्हणजे उच्चशिक्षित तरुणांना कट्टरपंथी बनवून त्यांना थेट जैश-ए-मोहम्मदमध्ये सामील करणे. तो पाकिस्तानी ऑपरेटर उमर बिन खत्ताब ऊर्फ हलजुल्लाह याच्या आणि जैशच्या अनेक कमांडरांच्या थेट संपर्कात होता. डॉक्टरांना या मॉड्यूलमध्ये आणणारा तोच मुख्य सूत्रधार होता. त्यानेच डॉ. मुजम्मिलला सर्वप्रथम जोडले.
डॉ. मुजम्मिल: मॉड्यूलचा आधारस्तंभ आणि स्फोटक वाहतूकदार
मौलवी इरफानच्या सांगण्यावरून त्याने इतर डॉक्टर्सना या मॉड्यूलमध्ये जोडले. त्याचे काम रेडिकलायझेशनचे होते, ज्यात अल-फलाह विद्यापीठातील अनेक विद्यार्थी त्याच्या टार्गेटवर होते. स्फोटांसाठी लागणाऱ्या स्फोटकांचे वाहतूक करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर होती.
डॉ. शाहीन: निधी पुरवणारी प्रोफेसर आणि संघटक
लखनऊची रहिवासी असलेली डॉ. शाहीन अल-फलाह विद्यापीठात प्रोफेसर होती. तिचे काम मॉड्यूलसाठी निधी जमा करणे आणि गरीब महिला-मुलींना जैश-ए-मोहम्मदच्या 'जमात-उल-मुमीनात' या संघटनेत सामील करणे हे होते. तिने मॉड्यूलला सुमारे २० लाख रुपयांचा निधी पुरवला होता. तिनेच तिचा भाऊ डॉ. परवेझ अन्सारी यालाही या कटाचा भाग बनवले.
डॉ. उमर नबी मोहम्मद: आत्मघाती बॉम्बर आणि केमिकल तज्ज्ञ
हा लाल किल्ल्यावर कार स्फोट घडवून आणणारा आत्मघाती बॉम्बर होता. मॉड्यूलमध्ये सर्वात जास्त रसायनशास्त्राची माहिती त्याच्याकडे होती. त्यानेच अमोनियम नायट्रेटपासून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. समोर आलेल्या त्याच्या व्हिडिओंमधून तो किती अतिरेकी विचारधारेने भरलेला होता, हे स्पष्ट होते.
डॉ. आदिल: हत्यार पुरवणारा आणि मॉड्यूलचा पर्दाफाश
याच्या अटकेनंतरच या संपूर्ण मॉड्यूलचा पर्दाफाश झाला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याला सहारनपूरमधून अटक केली होती. त्याच्या माहितीवरूनच डॉ. मुजम्मिल आणि डॉ. शाहीन यांना पकडण्यात आले. मॉड्यूलसाठी हत्यारे आणि शस्त्रे मिळवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. फरिदाबादमधून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि २९०० किलो स्फोटके याच तपासात जप्त झाली.
जसीर बिलाल वाणी ऊर्फ दानिश: बॉम्ब बांधण्यात प्रशिक्षित तज्ज्ञ
बॉम्ब बांधण्यात प्रशिक्षित असलेला हा मॉड्यूलची महत्त्वाची कडी आहे. त्याला डॉ. उमरने जोडले होते. तो सध्या ड्रोनमध्ये स्फोटके बांधून रिमोटने स्फोट घडवून आणण्याची तयारी करत होता. यानंतर त्याला मॉड्यूलसाठी रॉकेट तयार करायचे होते. एनआयएने त्याला नुकतीच काश्मीरमधून अटक केली आहे.
आमिर: लॉजिस्टिक पुरवणारा
काश्मीरचा रहिवासी असलेला आमिर डॉ. उमरच्या थेट संपर्कात होता. त्याचे काम मॉड्यूलसाठी लॉजिस्टिक पुरवणे हे होते. स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या i20 कारची व्यवस्था त्यानेच केली होती. ही कार विकत घेण्यासाठी त्याला डॉ. उमरने दहशतवादी निधीतून पैसे दिले होते.
या डॉक्टर मॉड्यूलमध्ये सामील असलेल्या प्रत्येक सदस्याच्या अटकेनंतर, राष्ट्रीय तपास यंत्रणा या संपूर्ण कटाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.