उत्तर प्रदेशमधील हाथरस येथून सायबर क्राईमचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर महिलांसोबत मैत्री करून त्यांच्या पायांचे फोटो मागणाऱ्या एका विकृत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. महिलांनी पायांचे फोटो न पाठवल्यास तो संबंधित महिलांना ब्लॅकमेल करायचा. आरोपीच्या फोनमधून एक हजारांहून अधिक महिलांच्या पायांचे फोटो सापडले आहेत. त्यामधून आरोपीच्या विकृत मानसिकतेचा उलगडा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हाथरसमधील एका तरुणीने १ फेब्रुवारी रोजी सायबर क्राईमकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. या तरुणीने तक्रारीत लिहिलं होतं की, २४ ऑक्टोबर २०२४ रोजी एका अज्ञात व्यक्तीने तिली स्नॅपचॅटवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होत. सुरुवातीला सामान्य बोलचाल झाल्यानंतर काही दिवसांनी आरोपीने अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. या तरुणीने विरोध केला तेव्हा आरोपीने चॅट व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्याने या तरुणीला पैशांचंही आमिष दाखवलं.
तक्रार मिळाल्यानंतर सायबर क्राइमच्या पथकाने सक्रिय होत तपास सुरू केला. पोलिसांनी टेक्निकल इंटेलिजन्सच्या मदतीने आरोपीचं लोकेशन शोधून काढलं. तसेच या आरोपीला हाथरसमधील रुहेरी तिठ्यावरून अटक केली. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपीचं नाव दीपक शर्मा असल्याचं समोर आलं. तो अलिगडमधील रहिवासी होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल चाळला असता त्यामध्ये १ हजारांहून अधिक महिलांच्या पायांचे फोटो सापडले.
पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये दीपक याला महिलांच्या पायांचे फोटो पाहण्याचा मानसिक आजार असल्याचं समोर आलं आहे. तो ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्गांनी महिलांशी मैत्री करून त्यांच्याकडे पायांचे फोटो मागायचा. जर कुण्या महिलेने त्याचं म्हणणं ऐकलं नाही तर तो त्या महिलेला धमकी देण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करायचा.