ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 09:58 IST2025-08-01T09:57:58+5:302025-08-01T09:58:43+5:30
एका तरुणाने ऑनलाईन गेमिंगमध्ये १८००० रुपये जिंकले. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना चला पार्टीला जाऊया असं म्हटलं.

फोटो - nbt
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने ऑनलाईन गेमिंगमध्ये १८००० रुपये जिंकले. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना चला पार्टीला जाऊया असं म्हटलं. पाचही जण पार्टी साजरी करण्यासाठी गाडीत बसले. पण वाटेत त्यांची गाडी पार्क केलेल्या ट्रॉलीवर आदळली. या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आणि तिघे गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गुलेरिया पोलीस स्टेशन परिसरातील डुमरी क्रमांक १ मध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. तसेच तीन तरुण गंभीर जखमी आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १८ वर्षीय सत्यम निषाद मंगळवारी ऑनलाईन गेममधून १८ हजार रुपये जिंकला होता. जेव्हा त्याच्या मित्रांना हे समजलं. तेव्हा सर्वांनी पार्टी करण्याचा बेत आखला आणि रात्री १० वाजता पार्टी करायला निघाले. यानंतर अपघात झाला.
मोठ्या आवाज ऐकून लोक तिथे पोहोचले. लोकांनी पाहिलं की गाडी पूर्णपणे खराब झाली आहे आणि पाचही तरुण त्यात अडकले आहेत. यानंतर सर्वांना बाहेर काढण्यात आलं आणि पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. इतरांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस स्टेशनचे प्रभारी जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, तिन्ही जखमी तरुणांना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. मुलांच्या कुटुंबातील सदस्यांना अपघाताबाबत माहिती देण्यात आली. हा अपघात जास्त वेगामुळे झाला.