हिंदूंचे गळे कापून स्वातंत्र्य मिळेल, भिक्षा मागून नाही; दहशतवादी अबू मुसा कोण आहे? व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 21:30 IST2026-01-14T21:30:00+5:302026-01-14T21:30:49+5:30
अबू मुसा हा लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एक काश्मिरी दहशतवादी आहे. तो जम्मू काश्मीर युनायटेड मूव्हमेंटचा एक वरिष्ठ कमांडर आहे. एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी त्याचा संबंध आहे.

हिंदूंचे गळे कापून स्वातंत्र्य मिळेल, भिक्षा मागून नाही; दहशतवादी अबू मुसा कोण आहे? व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तान भारताविरोधात गरळ ओकणे थांबत नाही. पाकिस्तान फक्त दहशतवाद्यांना आश्रय देत नाही तर त्यांना सुरक्षित आश्रयस्थाने देखील देत आहे, यामुळेच तेथील दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध विष ओकण्यास सुरुवात केली आहे. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी अबू मुसा काश्मिरी याने हिंदूंचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये तो उघडपणे हिंदूंना मारण्याबद्दल बोलतो.
त्यांनी हे विधान पाकव्याप्त काश्मीर मध्ये केले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओची तारीख निश्चित झालेली नाही. या व्हिडिओमध्ये मुसा असे म्हणताना ऐकू येतो की, "काश्मीरचा प्रश्न केवळ दहशतवाद आणि जिहादने सोडवता येईल. स्वातंत्र्य भीक मागून मिळणार नाही, तर हिंदूंचे शिरच्छेद करून मिळेल. आपण जिहादचा झेंडा उंचावला पाहिजे." या व्हायरल व्हिडिओमध्ये, मुसा आपल्या प्रक्षोभक भाषणात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोर झालेल्या हत्याकांडाबद्दलही बोलतो.
दहशतवाद्यांचा संपर्क पंतप्रधान शाहबाजपर्यंत पोहोचला
मुसाने वैयक्तिकरित्या पाकिस्तानी पंतप्रधान आणि वरिष्ठ मंत्र्यांना सांगितले की, त्यांना वाटते की काश्मीर प्रश्न फक्त "जिहादच्या नावाखाली दहशतवादाद्वारे" सोडवला जाऊ शकतो. असा सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला आहे. या दहशतवाद्यांचा पाकिस्तानी सरकार आणि सर्वोच्च लष्करी कमांडपर्यंत प्रवेश आहे.
दहशतवादी अबू मुसा काश्मिरी कोण आहे?
अबू मुसा काश्मिरी हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे. तो जम्मू काश्मीर युनायटेड मूव्हमेंट या लष्कर-ए-तोयबाशी संलग्न संघटनेचा वरिष्ठ कमांडर आहे. एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही तो सहभागी होता. त्यावेळी पहलगामवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना तो आदेश देत होता. यामध्ये आणखी एक दहशतवादी रिझवान हनीफ देखील सामील होता. अबू मुसा हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. तो सैफुल्लाह कसुरीचा जवळचा सहकारी देखील आहे.