अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:50 IST2026-01-09T13:46:18+5:302026-01-09T13:50:35+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांची माहिती.

अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
नवी दिल्ली: देशातील वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून व्हेइकल टू व्हेइकल (V2V) संवाद तंत्रज्ञान आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिली. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाहनांना एकमेकांशी थेट संवाद साधता येणार असून, अपघात होण्याआधीच चालकांना धोक्याचा इशारा मिळणार आहे.
'Vehicle-to-Vehicle Communication System (V2V)' वाहनों के बीच संवाद स्थापित कर ड्राइवर को सतर्क करेगी।#RoadSafety#SadakSurakshaAbhiyaan#सड़कसुरक्षाअभियानpic.twitter.com/ipM79GTctn
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 9, 2026
V2V तंत्रज्ञान कसे काम करेल?
V2V (Vehicle-to-Vehicle) संवाद प्रणालीमुळे आसपासच्या वाहनांचा वेग, स्थान, ब्रेकिंग, अचानक दिसणारे अडथळे किंवा ब्लाइंड स्पॉटवर वाहन चालकांना रिअल-टाइम अलर्ट मिळेल. त्यामुळे चालक वेळीच योग्य निर्णय घेऊ शकतील आणि अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल. या उद्देशाने दूरसंचार विभागासोबत संयुक्त कार्यदल स्थापन करण्यात आला असून, V2V संवादासाठी 5.875 ते 5.905 GHz दरम्यानचा 30 MHz स्पेक्ट्रम वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
देश में जल्द ही शुरु होगी 'कैशलेस ट्रीटमेंट' योजना : रोड एक्सिडेंट घटना में जान बचाने के लिए होगी मददगार।#RoadSafety#SadakSurakshaAbhiyaan#सड़कसुरक्षाअभियानpic.twitter.com/p357UO8IHO
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 9, 2026
अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना
गडकरी यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार लवकरच रस्ते अपघात पीडितांसाठी कॅशलेस वैद्यकीय उपचार योजना सुरू करणार आहेत. या योजनेंतर्गत अपघातग्रस्तांना किमान सात दिवसांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.
‘राहवीर’ योजनेत मदत करणाऱ्याला सन्मान
कोणत्याही रस्ते अपघातात जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या मदतनीसाला सरकारकडून 25 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. अशा मदत करणाऱ्या नागरिकांना ‘राहवीर’ असे संबोधले जाईल. ही योजना उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि चंदीगडसह काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पायलट प्रकल्प म्हणून यशस्वीपणे राबवण्यात आली आहे.
देशातील अपघातांची गंभीर स्थिती
गडकरी यांनी सांगितले की, देशात दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये जवळपास 1.8 लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील सुमारे 66 टक्के मृत्यू 18 ते 34 वयोगटातील तरुणांचे आहेत.
मोटार वाहन कायद्यात मोठे बदल प्रस्तावित
सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोटार वाहन अधिनियमात 61 सुधारणा सुचवणार आहे. यामागील उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
रस्ते सुरक्षेत सुधारणा
कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक करणे
नागरिक सेवांचा दर्जा उंचावणे
व्यवसाय सुलभता वाढवणे
जागतिक मानकांशी सुसंगत नियम तयार करणे
बैठकीत इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
नवी दिल्लीत झालेल्या परिवहन विकास परिषदेच्या 43व्या बैठकीत बस व प्रवासी वाहनांसाठी सुधारित सुरक्षा मानके, बस बॉडी कोड, BNCAP सुरक्षा रेटिंग, टप्प्याटप्प्याने ADAS (Advanced Driver Assistance System) लागू करणे, तसेच वाहतूक नियमभंगासाठी डिमेरिट व मेरिट पॉइंट सिस्टीम लागू करण्यावरही चर्चा झाली. याशिवाय ठराविक वजनापर्यंतच्या मालवाहू वाहनांसाठी डिजिटल व स्वयंचलित परवाना प्रणाली लागू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.