मतिमंद मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप
By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST
अप्पर आयुक्त श्याम देशपांडे यांच्या पुढाकाराने विभागात विशेष उपक्रम
मतिमंद मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप
अप्पर आयुक्त श्याम देशपांडे यांच्या पुढाकाराने विभागात विशेष उपक्रमपुणे: विभागातील सर्व पाच ही जिल्ह्यात मतिमंद मुलींचा सर्वे करुन वयात येणा-या मुलींना दर महिन्याला मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद यांच्या सक्रीय सहभागातून लोकवर्गणी गोळा करुन ही मोहिम सुरु करण्यात येणार असल्याचे अप्पर आयुक्त श्याम देशपांडे यांनी सांगितले.याबाबत देशपांडे यांनी सांगितले की, विभागातील पुणे, सांगली,सातारा,सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील मतिमंद मुलींचा सर्वे करुन मुलींची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर यामध्ये वयात येणा-या मुली लक्षात घेऊन दर महिन्याला किती सॅनिटरी नॅपकीन लागतील हे निश्चित करुन त्या पध्दतीने नियोजन करण्यात येणार आहे. सध्या मेडीकल स्टोअर आसोसिएशनच्या माध्यमातून अशा प्रकारे सातारा आणि जालना जिल्ह्यात हा उपक्रम सुरु आहे. त्यामुळे आता पुणे विभागातील अन्य चार जिल्ह्यांमध्ये देखील ही मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी लवकरच जिल्हा परिषद, महिला व बालकल्याण अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि मेडीकल स्टोअर संघटनेचा जिल्हा अध्यक्ष यांची बैठक घेऊन उपक्रमाची रुपरेषा ठरविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मतिमंद मुलीची संख्या निश्चित झाल्यानंतर अंगणवाडी सेविका मार्फत दर महिन्याला या मुलींच्या घरी सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात येणार असल्याचे देशपांड यांनी स्पष्ट केले.