नवी दिल्ली -कोरोना व्हायरसने इराणमध्येही धुमाकूळ घालता आहे. येथे कोरोनोच्या सावटाखाली आडकलेल्या तब्बल 53 भारतीय नागरिकांचा जथ्था सोमवारी स्वदेशी परतला. याच बरोबर इराणमधून सुटका झालेल्या भारतीय नागरिकांची संख्या आता 389 झाली आहे. यापूर्वी रविवारी 230 भारतीय नागरिकांची इराणमधून सुटका करण्यात आली होती, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे.
जयशंकर म्हणाले, 'इराणमधून ५३ भारतीयांचा चौथा जथ्था भारतात परतला आहे. या ५२ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. इराणची राजधानी तेहरान आणि शिराज या शहरांमधून यांची सुटका करण्यात आली. इराणमधून सुटका करण्यात आलेल्या भारतीयांची संख्या आता ३८९ झाली आहे.' या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या इराणमधील भारतीय दुतावासाचे आणि इराणच्या उच्चाधिकाऱ्यांचेही जयशंकर यांनी आभार मानले आहेत.
इराणमधून थेट राजस्थानातील जैसलमेर विमानतळावर पोहोचलेल्या या ५३ नागरिकांना येथील आर्मी वेलनेस सेंटरमध्ये नेण्यात आले. येते त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोना ग्रस्तांची दोशातील आकडेवारी अशी -महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 32 रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. याशिवाय केरळमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशात 13, दिल्लीत 7, कर्नाटकात 6, तेलंगानामध्ये 3, लद्दाखमध्ये 3, राजस्थानमध्ये 2, जम्मू काश्मीरमध्ये 2, तामिळनाडू, पंजाब आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी 1 कोरोना बाधित रुग्ण आढूळन आले आहेत.
याच बरोबर कोरोनाचा संसर्ग झालेल्या 17 परदेशी नागरिकांपैकी 14 जणांना हरियाणा, 2 जणांना राजस्थान आणि एकाला उत्तर प्रदेशात ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एआयआयएमएसने (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) आता 9971876591 हा 24/7 हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.