पोलीस भरतीसाठी आली चार महिन्यांची गरोदर महिला; धावायला लागली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 13:54 IST2025-02-16T13:53:47+5:302025-02-16T13:54:19+5:30
डॉक्टरांनी महिलेला धावायला मनाई केलेली.

पोलीस भरतीसाठी आली चार महिन्यांची गरोदर महिला; धावायला लागली अन्...
UP News : उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक विचित्र घटना समोर आले आहे. या ठिकाणी सध्या पोलीस भरती सुरू आहे. यात एका गरोदर महिलादेखील आली होती. विशेष म्हणजे, तिने धावण्याच्या चाचणीत भाग घेतला अन् शर्यत सुरू होताच धावू लागली. पण, मध्येच ती थांबली आणि तिने पोलीस अधिकाऱ्यांकडे पाच महिन्यांनी पुन्हा संधी मिळण्याची परवानगी मागितली.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कानपूरमध्ये पोलीस भरती सुरू आहे. ही भरतीप्रक्रिया 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 27 पर्यंत चालणार आहे. काही स्त्री-पुरुष उमेदवारांनी दिलेल्या तारखेऐवजी आणखी काही वेळ मागितला आहे. यापैकी दोन महिला उमेदवारांचे अर्ज सर्वात वेगळे आहेत. एक महिला उमेदवार चार महिन्यांची गरोदर आहे, तर दुसरीने काही काळापूर्वीच मुलाला जन्म दिला आहे. या दोघींनी भरतीसाठी वेळ मागितला आहे.
विशेष म्हणजे, पोलीस भरतीचे अर्ज खूप पूर्वी भरण्यात आले होते. पण, भरती प्रक्रिया सुरू झाली तेव्हा बहुतांश महिला उमेदवारांचे लग्न झाले, तर काही गरोदर राहिल्या. त्यापैकी या दोन महिला उमेदवारांनी लेखी व कागदपत्र चाचणीत भाग घेतला होता, मात्र जेव्हा धावण्याची वेळ आली, तेव्हा अडचण झाली. चार महिन्यांची गरोदर महिला धावायला लागली, पण धावू शकली नाही. तिने मैदानी चाचणीसाठी काही महिन्यांचा वेळ मागितला असून, तिची मागणी मान्य झाली आहे.
तर दुसऱ्या महिलेने नुकतेच ऑपरेशनद्वारे मुलाला जन्म दिला आहे. डॉक्टरांनी तिला धावायलाही मनाई केली आहे, पण ती नोकरीची संधी सोडू इच्छित नाही. तिची मागणीही अधिकाऱ्यांनी मान्य केली असून, तिलाही काही महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. याशिवाय, काही उमेदवारांनी शेवटच्या दिवशी चाचणी घेण्याची मागणी केली असून, त्यांची मागणीही मंजूर झाली आहे.