Mahakumbh 2025: बेळगावच्या चार भाविकांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू, कर्नाटक सरकारकडून मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:05 IST2025-01-30T13:04:41+5:302025-01-30T13:05:55+5:30
मृतांमध्ये मायलेकीसह भाजपची कार्यकर्ती

Mahakumbh 2025: बेळगावच्या चार भाविकांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू, कर्नाटक सरकारकडून मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू
बेळगाव : प्रयागराज कुंभमेळ्यातील शाही स्नानावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगावच्या चार भाविकांचा मृत्यू झाला. ज्योती दीपक हत्तरवाड (वय ४४) व त्यांची मुलगी मेघा दीपक हत्तरवाड (२४, रा. नाजर कॅम्प वडगाव, बेळगाव), अरुण खोरपडे (६१) व महादेवी हनुमंत भवनूर (४८, रा. शिवाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत.
चार दिवसांपूर्वी ते एका खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून कुंभमेळाव्याला गेले होते. दुपारी कुंभमेळ्यातील मृतांची नावे माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर येथील मृत भाविकांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मृतांच्या घरासमोर नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी सांत्वनासाठी गर्दी केली होती.
कर्नाटक सरकारने उत्तर प्रदेश सरकारशी संपर्क साधून प्रयागराज येथून भाविकांचे मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बेळगाव जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी हर्ष शेट्टी व अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख श्रुती एन. एस. यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. ते विशेष पथकासह प्रयागराजला रवाना झाले आहेत.
मृत ज्योती व मेघा ह्या दोघी मायलेकी वडगाव येथील आपल्या घराजवळच बुक स्टॉल चालवित होत्या. शिवाजीनगर येथील महादेवी भवनूर या भाजपच्या कार्यकर्त्या असून, त्या भाडोत्री खोलीत राहत होत्या. शेट्टी गल्लीतील मृत अरुण खोरपडे यांच्या पत्नी कांचन खोरपडे या ब्युटीपार्लर चालवितात. चेंगराचेंगरीत कांचन यादेखील जखमी झाल्या आहेत.