स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:37 IST2026-01-12T16:36:28+5:302026-01-12T16:37:02+5:30
"कर्तव्य भवन-३" चे उद्घाटन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झाले होते, जिथे गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयासह इतर अनेक मंत्रालये देखील स्थलांतरित करण्यात आली आहेत.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवीन कार्यालयाचं लवकरच खुले होणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने मोदी नव्या पीएमओमधून कामाला सुरुवात करतील. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार आहे. नवीन पीएमओ कार्यालय सेवा तीर्थ परिसराचा हिस्सा असेल. ज्यात पंतप्रधान कार्यालयासोबतच अन्य २ कार्यालये असतील. सेवा तीर्थ भागात एकूण ३ इमारती बनवण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी याच आठवड्यात रायसीना हिल्सजवळील नवीन कार्यालय सेवा तीर्थ १ इथून कामाला सुरुवात करू शकतात. हा परिसर सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा हिस्सा आहे. आता पीएमओ साऊथ ब्लॉकमध्ये आहे. सेवा तीर्थ परिसरात पीएमओशिवाय कॅबिनेट सचिवालय आणि नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सेक्रेटेरियट यांचे कार्यालय असेल. त्यासाठी ३ इमारती बांधण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिवालय मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातच सेवा तीर्थ २ याठिकाणी शिफ्ट झाले आहे.
११८९ कोटी खर्च करून उभारलं सेवा तीर्थ
१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंतप्रधान कार्यालय साऊथ ब्लॉकमध्ये सुरू होते जे कायम भारताचे सत्ता केंद्र राहिले. आता पूर्ण सेवा तीर्थ परिसर जवळपास ११८९ कोटी खर्च करून उभारण्यात आला आहे. त्याला लार्सन एँन्ड टुब्रो यांनी बनवले आहे. सेवा तीर्थ परिसर एग्झिक्यूटिव्ह एन्क्लेव्ह १ नावानेही ओळखला जातो. हे संपूर्ण कॉम्प्लेक्स २,२६,२०३ चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे.
एग्झिक्यूटिव्ह एन्क्लेव १ जवळच एग्झिक्यूटिव्ह एन्क्लेव २ चं बांधकाम सुरू आहे. ज्याठिकाणी सात लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांचं निवासस्थान अधिकृतपणे तिथे शिफ्ट होईल. नवीन कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट (CCS) इमारतींच्या बांधकामाचे काम सुरू आहे, जिथे विविध केंद्र सरकारच्या मंत्रालयांची कार्यालये स्थलांतरित केली जातील. यापैकी "कर्तव्य भवन-३" चे उद्घाटन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झाले होते, जिथे गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयासह इतर अनेक मंत्रालये देखील स्थलांतरित करण्यात आली आहेत. ब्रिटिश काळातील दक्षिण आणि उत्तर ब्लॉक पूर्णपणे रिकामे झाल्यानंतर ते "युग युगिन भारत संग्रहालय" मध्ये रूपांतरित केले जातील जे भारताच्या ५,००० वर्ष जुन्या वारशाचे प्रदर्शन करेल. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या मते, "हे संग्रहालय भारताच्या समृद्ध वारशाचे आणि प्रगतीच्या अटळ भावनेचे प्रतीक असेल.