धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 07:38 IST2025-12-28T07:37:54+5:302025-12-28T07:38:15+5:30
विमान कंपनी 'इंडिगो'ने शनिवारी तब्बल ५७ उड्डाणे रद्द केली. अचानक विमान फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागांत थंडीचा जोर वाढला असून, त्याचा थेट परिणाम आता विमान वाहतुकीवर होऊ लागला आहे. खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे प्रसिद्ध विमान कंपनी 'इंडिगो'ने शनिवारी तब्बल ५७ उड्डाणे रद्द केली आहेत. अचानक विमान फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, विमानतळांवर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नेमके कारण काय?
इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, विविध शहरांमधील खराब हवामानाचा अंदाज घेऊन सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी देखील जवळपास १३ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये काही तांत्रिक कारणांचा समावेश असला, तरी मुख्यत्वे धुक्यामुळे कमी झालेली दृश्यमानता हेच यामागील प्रमुख कारण असल्याचे कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर स्पष्ट केले आहे.
'या' शहरांतील प्रवाशांना फटका
रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये मुंबईसह पुणे, दिल्ली, चंदीगड, अहमदाबाद, हैदराबाद, अमृतसर, बेंगळुरू, कोलकाता, चेन्नई आणि जयपूर यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या आणि पहाटेच्या उड्डाणांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर विमान कंपनीच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.
DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
वाढत्या धुक्याच्या पार्श्वभूमीवर विमानन नियामक संस्था नागरी विमान वाहतूक संचालनालय सतर्क झाली आहे. १० डिसेंबर ते १० फेब्रुवारी हा काळ अधिकृतपणे 'धुक्याचा काळ' म्हणून घोषित करण्यात आला आहे. या काळात विमान कंपन्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वैमानिकांसाठी विशेष नियम
धुक्यात विमान उतरवणे हे मोठे आव्हान असते. त्यामुळे अशा हवामानात विमान चालवण्यासाठी प्रशिक्षित असलेल्या वैमानिकांचीच (CAT-III B Trained Pilots) नियुक्ती करावी, असे निर्देश DGCAने दिले आहेत. तसेच, विमानांमध्ये 'CAT-III B' ही प्रगत नेव्हिगेशन प्रणाली असणे अनिवार्य केले आहे, ज्यामुळे शून्य दृश्यमानता असतानाही विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवता येते.
दरम्यान, इंडिगोने यापूर्वी डिसेंबरच्या सुरुवातीला वैमानिकांच्या कामाच्या तासांच्या नियमांमुळे अनेक उड्डाणे रद्द केली होती. आता हवामानाने पुन्हा एकदा प्रवाशांच्या वेळापत्रकाचे तीन-तेरा वाजवले आहेत. त्यामुळे आगामी काही दिवस प्रवासाला निघण्यापूर्वी विमानाचे स्टेटस तपासूनच बाहेर पडणे प्रवाशांसाठी हिताचे ठरणार आहे.