फिक्सिंगमुळे क्रिकेटचे अस्तित्व धोक्यात - सुप्रीम कोर्ट
By Admin | Updated: November 24, 2014 16:22 IST2014-11-24T15:28:09+5:302014-11-24T16:22:13+5:30
फिक्सिंगसारख्या प्रकारांमुळे क्रिकेटचे अस्तित्वच धोक्यात येईल असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

फिक्सिंगमुळे क्रिकेटचे अस्तित्व धोक्यात - सुप्रीम कोर्ट
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असून तो खेळाडू वृत्तीनेच खेळला गेला पाहिजे, पण तुम्ही फिक्सिंगसारख्या प्रकारांना पाठिशी घालून क्रिकेटलाच संपवत आहात अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयची कानउघडणी केली आहे. बीसीसीआयचे प्रमुख आणि बेटिंग प्रकरणात अडकलेल्या आयपीएल संघाचे मालक या नात्याने श्रीनिवासन यांनी उपस्थित होणा-या प्रश्नांवर उत्तर द्यायलाच पाहिजे असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
सोमवारी आयपीएल फिक्सिंग प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुदगल समितीच्या अहवालाचा दाखला देत सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला फटकारले. मुदगल समितीच्या अहवालात श्रीनिवासन यांना क्लीन चीट मिळाल्याने त्यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा करावा अशी भूमिका बीसीसीआयने न्यायालयासमोर मांडली. यावर सुप्रीम कोर्टाने तुम्ही तर क्लीन चीट मिळाल्याचे समजतांय असे श्रीनिवासन यांना सांगितले. संशयाचा फायदा एखाद्या व्यक्ती किंवा खेळाडूला देण्याऐवजी खेळाला द्यायला हवा असेही न्यायालयाने म्हटले आहे.
भारतात क्रिकेट हा धर्म असून सामने फिक्स असल्याचे जनतेच्या लक्षात आल्यास स्टेडियममध्ये लोकं येतील का असा सवालही सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला विचारला. मुदगल समितीच्या निष्कर्षांवर निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयतर्फे चौकशी समितीची स्थापना केली जाईल व त्यामध्ये श्रीनिवासन यांचा सहभाग नसेल असे आश्वासन बीसीसीआयने कोर्टाला दिले. यासंदर्भातील पुढील सुनावणी उद्या दुपारी होणार आहे.