पाच वर्षीय चिमुकला लिफ्टमध्ये अडकला; एक तास बचावकार्य चालले, पण मृतदेहच बाहेर आला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:22 IST2025-08-25T19:22:05+5:302025-08-25T19:22:29+5:30
या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पाच वर्षीय चिमुकला लिफ्टमध्ये अडकला; एक तास बचावकार्य चालले, पण मृतदेहच बाहेर आला...
Child Stuck in Lift:गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लिफ्टमध्ये अडकून एका पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नीरव स्क्वेअर अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावरुन खाली येताना मुलगा लिफ्टमध्ये अडकला होता. कटरने लिफ्ट कापून त्याला बाहेर काढले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे.
ही घटना जिल्ह्यातील बिजलपूर भागातील आहे. आई मुलाला घेऊन बाहेर जात होती. आई घराला कुलूप लावत असताना मुलगा लिफ्टच्या दिशेने पळाला. आई मुलाच्या मागे धावली, परंतु मुलगा तोपर्यंत लिफ्टमध्ये शिरला अन् बटन दाबले. लिफ्ट खालच्या दिशेने निघाली, मात्र मुलाच्या शरीराचा एक भाग लिफ्टच्या दारात अडकला होता. यानंतर तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.
सुमारे एक तास चाललेल्या बचावकार्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कटर मशीनने लिफ्ट कापून मुलाला बाहेर काढले. कुटुंबीयांनी मुलाला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडिलांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे इमारतीमधील इतर लोकांनाही मोठा धक्का बसला आहे. अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.