तिहेरी तलाकविरोधात सर्वप्रथम आवाज उठवणारे म्हणाले आता मी शांतपणे मरू शकेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 21:46 IST2017-08-22T21:37:04+5:302017-08-22T21:46:52+5:30
तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशभरात या निर्णयाबाबत जे समाधान व्यक्त केले जात आहे. तिहेरी तलाकविरोधात सर्वप्रथम राजकीय आवाज उठवणाऱ्या आरिफ मोहम्मद खान यांनीही तिहेरी तलाकचे स्वागत केले आहे.

तिहेरी तलाकविरोधात सर्वप्रथम आवाज उठवणारे म्हणाले आता मी शांतपणे मरू शकेन
बहराइच, दि. 22 - तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशभरात या निर्णयाबाबत जे समाधान व्यक्त केले जात आहे. तिहेरी तलाकविरोधात सर्वप्रथम राजकीय आवाज उठवणाऱ्या आरिफ मोहम्मद खान यांनीही तिहेरी तलाकचे स्वागत केले आहे. आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेल्या खान यांना जेव्हा या निर्णयाची माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी हा मानवता, संविधान आणि इस्लामचा विजय असल्याचे सांगितले. तसेच दीर्घकाळ चाललेल्या लढ्याला न्यायालयात यश मिळाल्याने आता मी शांतपणे मरू शकेन अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशभरात या निर्णयाबाबत जे समाधान व्यक्त केले जात आहे त्याचे सर्वाधिक श्रेय त्या महिलांना जाते ज्यांनी या प्रथेविरोधात न्यायालयात धाव घेतली. तसेच इस्लामच्या नावाने दुकान चालवणाऱ्यांची बाजू न घेता मानवतेची बाजू घेणाऱ्या सध्याच्या सरकारचेही अभिनंदन केले पाहिजे, असे आरिफ मोहम्मद खान म्हणाले.
माजी खासदार आणि माजी मंत्री असलेल्या आरिफ मोहम्मद खान यांनी मुस्लिम समाजातील तिहेरी तलाकविरोधात प्रथम राजकीय बंडखोरी केली होती. 1986 साली शाहबाने खटल्यावेळी राजीव गांधी सरकारने कट्टरपंथी मुस्लिमांच्या दबावासमोर झुकून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला होता. आरिफ मोहम्मद खान यांनी या निर्णयाचा विरोध केला होता. "एक ना एक दिवस महिलांना त्यांचे अधिकार मिळतील असे मी त्यावेळी म्हटले होते. आज तो दिवस आला आहे. आता मी शांतपणे मरू शकतो." आरिफ मोहम्मद खान यांनी शाहबाने खटल्यावेळी राजीव सरकारने केलेल्या घटना दुरुस्तीला विरोध केला होता. तसेच त्याच निषेध म्हणून राजीनामाही दिला होता.
अधिक वाचा
पाकिस्तानसह या देशांमध्ये आधीपासूनच 'बॅन' आहे ट्रिपल तलाक, बंदी आणणारा इजिप्त होता जगातला पहिला देश
तिहेरी तलाक प्रकरण: शायराबानोच्या खटल्यामुळे शाहबानो खटल्याची आठवण
तिहेरी तलाक : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड भोपाळमधील बैठकीत ठरवणार पुढील रणनीती
दरम्यान, गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज आपला निकाल सुनावला. तिहेरी तलाक ही प्रथा बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. तसेच, केंद्र सरकारनं सहा महिन्यांमध्ये तिहेरी तलाकला बंदी घालणारा कायदा बनवावा, असे निर्देश सरन्यायाधीश खेहर यांनी दिले. दरम्यान, कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर 6 महिने बंदी घालण्यात आली आहे.
पाच न्यायाधीशांचे घटनापीठ देणार असलेल्या या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशभरातील मुस्लिम महिलांचं या निकालाकडे लक्ष लागले होते. निकाल संपूर्णपणे नि:ष्पक्ष असावा आणि कुणालाही तक्रार करण्यास वाव राहू नये या उद्देशाने निकाल सुनावणाऱ्या घटनापीठात पाच प्रमुख धर्मांच्या न्यायमूर्तींचा समावेश करण्यात आला. सरन्यायाधीश जे.एस. खेहर (शीख), कुरियन जोसेफ (ख्रिश्चन), आर.एफ. नरिमन (पारशी), यू.यू. लळित (हिंदू) आणि अब्दुल नजीर (मुस्लिम) यांचा समावेश आहे.