नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 13:13 IST2025-12-14T13:10:49+5:302025-12-14T13:13:51+5:30
गोव्यातील नाईट क्लबमध्ये लागलेली आग ही दुर्घटना नव्हती, तर निष्काळजीपणामुळे हे घडल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. या प्रकरणात आता आणखी काही माहिती समोर आली आहे.

नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
गोव्यातील बिर्च क्लबमध्ये लागलेल्या आगीच्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आग लागल्यानंतर लुथरा ब्रदर्स गुपचूप दिल्लीवरून थायलंडला फरार झाले. या क्लबचा दुसरा मालक अजय गुप्ताही परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. देश सोडून पळून जाण्यामागे नाईट क्लबमध्ये वारंवार झालेल्या चुकांचा मुद्दा असल्याचे आता समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नाईट क्लबमधील उणीवांबद्दल अनेक वेळा इशारा दिला होता. पण, त्याकडे क्लबच्या मॅनेजमेंटकडून दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे ज्या दिवशी रात्री नाईट क्लबमध्ये आग लागली, त्यानंतर लुथरा ब्रदर्स फरार झाले. तर अजय गुप्ता हा फरार होण्याच्या तयारीत होता.
आग लागल्यानंतर पडद्यामागे काय घडलं?
एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रोमियो लेनमध्ये असलेल्या बिर्च क्लबमध्ये भीष आग लागली. यात अनेकांचा मृत्यू झाला. पोलीस सध्या ही घटना कशी घडली आणि आरोपी रात्रीतून फरार कसे झाले, याबद्दलचाही तपास करत आहेत.
गोवा पोलिसांनी सांगितले की, आग लागल्यानंतर लगेच लुथरा ब्रदर्स गायब झाले. जेव्हा आग लागली, तेव्हा लुथरा ब्रदर्स दिल्लीत एका लग्न सोहळ्यात होते. नाईट क्लबमध्ये आग लागल्यानंतर ते सातत्याने क्लबच्या टीमसोबत संपर्कात होते. ते क्षणाक्षणाची माहिती त्यांच्याकडून घेत होते.
एक लिफाफा लुथरा ब्रदर्सच्या घरी पोहोचला आणि...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर लुथरा ब्रदर्संनी परदेशात पळून जाण्याचा प्लॅन सुरु केला. लग्नात असलेल्या लुथरा ब्रदर्सपैकी एकाने त्याच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्याला कॉल केला आणि त्याने परदेशात जाण्याचे विमानाचे तिकीट बुक करायला सांगितले.
क्लबचा मॅनेजर भरत कोहलीला मॉडल टाऊन ऑफिसमध्ये जाऊन एक खास लिफाफा आणण्यासाठी सांगण्यात आले. हा लिफाफा लुथरा ब्रदर्सच्या मुखर्जी नगरमधील घरी पोहचवण्यास सांगण्यात आले.
तपासातून समोर आले की, परदेशात पळून जाण्याचा निर्णय घाई घाईत घेण्यात आलेला नव्हता. लुथरा ब्रदर्सकडे ब्रिटनचा दीर्घ काळासाठीचा व्हिसा होता, पण दोघांनी एकत्रच थायलंडला जाण्याचा निर्णय घेतला. अशीही माहिती समोर आली आहे की, आगीची घटना घडली, त्याच्या चार दिवसापूर्वीच दोन्ही भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय हे दुबईवरून भारतात परतले होते.