वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 08:40 IST2025-08-10T08:40:01+5:302025-08-10T08:40:22+5:30
वाराणसीच्या चौक परिसरात असलेल्या आत्म विश्वेश्वर मंदिरात आरतीदरम्यान आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.

वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर
उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या चौक परिसरात असलेल्या आत्म विश्वेश्वर मंदिरात आरतीदरम्यान आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. आरतीच्या ताटात लागलेल्या आगीने क्षणार्धात मोठा पेट घेत मंदिरात केलेली कापसाची सजावट उद्ध्वस्त केली. शृंगारात वापरलेल्या वेगवेगळ्या गोष्टींनी या आगीची तीव्रता आणखीनच वाढवली. या दुर्घटनेत पूजेच्या वेळी मंदिरात उपस्थित असलेले पूजारी आणि ९ भाविक आगीत होरपळले आहेत. या पैकी ४ जणांची प्रकृती अधिक गंभीर असून, त्यांना दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकी कशी घडली घटना?
शनिवारी संध्याकाळी, वाराणसीच्या चौक पोलीस स्टेशन परिसरातील संकट गली येथे स्थित आत्म विश्वेश्वर मंदिरात आरती सुरू असताना, एक जळता दिवा पडला आणि तिथे असलेल्या कापसाच्या सजावटीने पेट घेतल्याने मंदिराला आग लागली. अपघाताच्या वेळी मंदिरात शेकडो भाविक उपस्थित होते.
मंदिरात आग लागताच मोठा गोंधळ उडाला होता. या अपघातात पुजाऱ्यासह नऊ भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच डीएमसह अनेक उच्च अधिकारी रुग्णालयात पोहोचले. आगीच्या घटनेतील जखमींची ओळख पटली असून, या जखमींमध्ये प्रिन्स पांडे, बैकुंठनाथ मिश्रा, सानिध्या मिश्रा, सत्यम पांडे, शिवानी मिश्रा, देव नारायण पांडे आणि कृष्णा यांचा समावेश आहे. या सर्वांना प्रथम विभागीय रुग्णालयात आणि नंतर महमूरगंज येथील जेएस मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
श्रावणाच्यानिमित्ताने करण्यात आली कापसाची खास सजावट
श्रावण महिन्याच्या निमित्ताने आत्म विश्वेश्वर मंदिरात कापसाने विशेष सजावट करण्यात आली होती. यावेळी शेकडो लोक आरतीसाठी मंदिरात पोहोचले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरती दरम्यान जळणारा दिवा पडला, ज्यामुळे कापसाच्या सजावटीने सजवलेल्या मंदिराला आग लागली. आग लागताच मंदिरात चेंगराचेंगरी देखील झाली.