अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 05:42 IST2025-09-30T05:42:18+5:302025-09-30T05:42:54+5:30
वीस वर्षांपूर्वीच्या मोटार अपघात प्रकरणात तेव्हा २० वर्षे वयाच्या असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सर्वोच्च न्यायालयाने ६० लाख रुपयांहून अधिक भरपाई मंजूर केली आहे.

अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
नवी दिल्ली : वीस वर्षांपूर्वीच्या मोटार अपघात प्रकरणात तेव्हा २० वर्षे वयाच्या असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सर्वोच्च न्यायालयाने ६० लाख रुपयांहून अधिक भरपाई मंजूर केली आहे. या अपघातानंतर ती व्यक्ती दिव्यांग झाली व दीर्घकाळ आजारी होता. त्याचा मृत्यू २०२१मध्ये झाला. या व्यक्तीचे नाव शरद सिंह असून, ते बीकॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत असताना २००१ मध्ये कारचालकाच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. ते २० वर्षे अंथरुणाला खिळून होते. या काळात त्यांची आई-वडिलांनी सेवा केली.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने भरपाईसाठी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले, ते न्यायालयाने मान्य केले. त्यामुळे तिने अखेर ही लढाई जिंकली.
भरपाईची कशी ठरवली?
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, ते एक हुशार विद्यार्थी होते. त्याची किमान ५,००० रुपये मासिक कमाई गृहीत धरली जाऊ शकते. भविष्यातील संभाव्य कमाईत ४० टक्के वाढ गृहीत धरून १५.१२ लाख भरपाई मंजूर केली.
त्याशिवाय परिचारकांचे खर्च, वेदना, वैवाहिक संधी गमावणे, वैद्यकीय खर्च आदी गोष्टी, भरपाई रकमेवरील ९ टक्के व्याज असे धरून ६० लाख रुपयांची मदत न्यायालयाने मंजूर केली.