तुफान राडा! शाळेत विद्यार्थ्यांसमोर शिक्षिका-प्राचार्य भिडले; एकमेकांच्या जीवावर उठले, चपलेने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 15:02 IST2022-08-31T14:57:05+5:302022-08-31T15:02:39+5:30
सरकारी शाळेत प्रभारी प्राचार्य आणि शिक्षिकेचा वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. चपलेने मारहाण केली.

तुफान राडा! शाळेत विद्यार्थ्यांसमोर शिक्षिका-प्राचार्य भिडले; एकमेकांच्या जीवावर उठले, चपलेने मारहाण
मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील सरकारी शाळेत प्रभारी प्राचार्य आणि शिक्षिकेचा वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. चपलेने मारहाण केली. या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. प्रकरणाची चौकशी करायला जिल्हा शिक्षण अधिकारी शाळेत पोहोचले. त्यांनी दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरी विधानसभा क्षेत्रातील रसेना गावात हा संपूर्ण प्रकार घडला. उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यावरून प्रभारी प्राचार्य आणि शिक्षिकेचा वाद झाला. दोघांना एकाचवेळी विद्यार्थ्यांना शिकवायचं होतं. त्यावरून दोघांचं भांडण झालं. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. यामध्ये महिला शिक्षिका विनीता धुर्वे प्राचार्य हरगोविंद जाटव यांना शिव्या देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
धुर्वे जाटव यांना चप्पलेने मारतानाही दिसत आहेत. हरगोविंद जाटव यांनी आधी शिवी दिल्याचा धुर्वे यांचा आरोप आहे. जाटव यांनी सर्वप्रथम शिवीगाळ केली. शिकवत असताना जबरदस्ती वर्गात घुसले आणि दोन्ही हात पकडून मला जमिनीवर पाडलं. त्यामुळे स्वत:च रक्षण करण्यासाठी मी त्यांना चपलेने मारलं, असं धुर्वे यांनी म्हटलं आहे.
जाटव यांनी धुर्वे यांचे आरोप फेटाळून लावले. मॅडम ज्यावेळी वर्गात गेल्या, तो तास माझा होता. वेळापत्रकानुसार तो तास माझाच आहे. मी त्याचवेळी शिकवतो. मात्र मॅडमला मी जबरदस्ती वर्गात घुसत असल्याचं वाटलं. त्यामुळेच हा वाद झाला, असं जाटव म्हणाले. या प्रकरणाची चौकशी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.