हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात शेतामध्ये लावलेल्या आगींमुळे नवी दिल्लीत प्रदूषण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 03:49 AM2020-11-02T03:49:21+5:302020-11-02T06:55:26+5:30

Pollution in New Delhi : दिल्ली नजीकच्या काही राज्यांमध्ये शुक्रवारी शेतात लावण्यात आलेल्या आगींचे प्रमाण याप्रमाणे होते. पंजाबमध्ये अंदाजे ४,२६६, हरयाणामध्ये १५५, उत्तर प्रदेशमध्ये ५१, मध्यप्रदेशात ३८१ ठिकाणी शेतात आगी लावण्यात आल्या.

Field fires in Haryana, Punjab, Uttar Pradesh and Madhya Pradesh have increased pollution in New Delhi | हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात शेतामध्ये लावलेल्या आगींमुळे नवी दिल्लीत प्रदूषण वाढले

हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात शेतामध्ये लावलेल्या आगींमुळे नवी दिल्लीत प्रदूषण वाढले

googlenewsNext

नवी दिल्ली : हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांत शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर लावलेल्या आगींमुळे प्रदूषणात वाढ होऊन दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर रविवारी अतिशय खराब झाला. मात्र, सोमवारपर्यंत ही स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
हवेच्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्याचे काम केंद्रीय पृथ्वी विज्ञान खात्याची सफर ही संस्था करते. तिने म्हटले आहे की, शेतात लावलेल्या आगींमुळे शनिवारपासून दिल्लीतील प्रदूषणात मोठी वाढ झाली होती. या आगींचा प्रदूषण वाढविण्यात ३२ टक्के वाटा होता. रविवारी दिल्लीतील हवेचे प्रदूषण आणखी वाढले.
दिल्ली नजीकच्या काही राज्यांमध्ये शुक्रवारी शेतात लावण्यात आलेल्या आगींचे प्रमाण याप्रमाणे होते. पंजाबमध्ये अंदाजे ४,२६६, हरयाणामध्ये १५५, उत्तर प्रदेशमध्ये ५१, मध्यप्रदेशात ३८१ ठिकाणी शेतात आगी लावण्यात आल्या. त्याचा थेट परिणाम दिल्लीतील हवा अधिक प्रदूषित होण्यावर झाला. मात्र, ही स्थिती सोमवारपर्यंत सुधारण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले.
दिल्लीमध्ये हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एक्यूआय) रविवारी सकाळी ३६६ इतका नोंदविला गेला. हा निर्देशांक ३०१ ते ४०० मध्ये असल्यास त्या ठिकाणच्या हवेची गुणवत्ता अतिशय खराब आहे असे मानले जाते. दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून ही स्थिती उद्भवली आहे. दिल्लीचा एक्यूआय शुक्रवारी ३७४, शनिवारी ३९५ होता. या शहराचे प्रदूषण नेमके कोणामुळे वाढते, या विषयावर मध्यंतरी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात वादही झाला होता.
नासाच्या छायाचित्रातही दिसले वास्तव
हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शेतांमध्ये आगी लावण्यात आल्याचे नासाच्या उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रातूनही स्पष्ट झाले होते. 

Web Title: Field fires in Haryana, Punjab, Uttar Pradesh and Madhya Pradesh have increased pollution in New Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.