सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:09 IST2025-12-04T12:08:09+5:302025-12-04T12:09:28+5:30
'स्क्रब टायफस' नावाच्या एका गंभीर आजाराने मोठी खळबळ माजवली आहे. या आजारामुळे आतापर्यंत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
आंध्र प्रदेशात 'स्क्रब टायफस' नावाच्या एका गंभीर आजाराने मोठी खळबळ माजवली आहे. या आजारामुळे आतापर्यंत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, आणखी एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा जीवघेणा आजार चिगर्स नावाच्या, काळ्या माशीसारख्या दिसणाऱ्या एका छोट्या किड्यामुळे होतो, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या धक्कादायक घटनेमुळे राज्यातील लोकांची चिंता वाढली आहे. विशाखापट्टणममध्ये सर्वाधिक ४३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
या जिल्ह्यांमध्ये वाढला धोका
स्क्रब टायफस या आजाराने आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांना चिंतेत टाकले आहे. चित्तूर, काकीनाडा, विशाखापट्टणम आणि विजयनगरम जिल्ह्यांत या आजाराचे अनेक रुग्ण समोर आले आहेत. यात, एकट्या विशाखापट्टणममध्ये सर्वाधिक ४३ पॉझिटिव्ह केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. पलनाडु जिल्ह्यातील रुद्रवरम गावात १२वीत शिकणाऱ्या ज्योती नावाच्या विद्यार्थिनीचा २० दिवसांपूर्वी ताप आणि पाठदुखीमुळे मृत्यू झाला होता. याच जिल्ह्यातील राजुपालेम येथे नागम्मा नावाच्या एका वृद्ध महिलेचाही २० दिवसांपूर्वी तापावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या दोन्ही मृतांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले होते. तपासणी अहवालात या दोघींचा मृत्यू स्क्रब टायफसनेच झाल्याची पुष्टी झाली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राजुपालेम येथील सलम्मा या अन्य महिलेवरही याच लक्षणांसह रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
'या' किड्यामुळे पसरतोय आजार
विजयनगरममध्येही तीन दिवसांपूर्वी याच आजारामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, हा आजार 'चिगर्स' नावाच्या किड्यामुळे पसरतो. हा किडा चावल्यानंतर शरीरावर पुरळ उठतात, आणि त्यासोबतच काळे डाग पडतात. हा काळा डाग स्क्रब टायफसच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे.
डॉक्टरांनी सांगितलेली प्रमुख लक्षणे:
- तीव्र ताप
- उलट्या होणे
- डोकेदुखी
- अंगदुखी
- कोरडा खोकला
किडा कुठे आढळतो?
विशाखापट्टणम येथील केजीएचचे अधीक्षक वाणी यांनी माहिती दिली की, स्क्रब टायफस पसरवणारे हे किडे प्रामुख्याने जंगल, शेती, झुडपे आणि गवताच्या ढिगाऱ्यांजवळ आढळतात. तसेच, घरात ठेवलेले जुने बिछाने, गादी आणि उश्यांमध्येही हे किडे सहजपणे प्रवेश करू शकतात. या सतत वाढणाऱ्या रुग्णांमुळे आंध्र प्रदेश सरकारची चिंता वाढली असून, आरोग्य विभागाने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.