'वडिलांचा बूट अन् आईची बांगडी सापडली, शरीर जळून राख झालेले', संभल पीडिताची अपबाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 20:07 IST2025-01-10T20:07:00+5:302025-01-10T20:07:31+5:30
संभलमध्ये 1978 साली झालेल्या दंगलीत 184 लोक मारले गेले होते. ही दंगल इतकी भयंकर होती की, हिंदू समाज संभलमधून स्थलांतरित झाला.

'वडिलांचा बूट अन् आईची बांगडी सापडली, शरीर जळून राख झालेले', संभल पीडिताची अपबाती
UP Sambhal : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील संभल चर्चेत आले आहे. प्रशासनाला या ठिकाणी अनेक पुरातन मंदिरे आणि बारव सापडल्यामुळे संभलची देशभरात चर्चा सुरू आहे. 1978 साली याच संभलमध्ये जातीय हिंसाचार झाला होता, ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच, तेव्हापासून आतापर्यंत अनेक मंदिरांवर अतिक्रमण करण्यात आले होते. पण, आता प्रशासनाने बहुतांश मंदिरे खुली केल्यामुळे 1978 च्या दंगलीतील पीडित एक एक करत पुढे येत आहेत आणि त्यांच्या वेदनादायक जगासमोर मांडत आहेत.
दंगलीत आई-वडिलांना गमावले
गुलाब सिंह सांगतात की, 1978 साली ते 20 वर्षांचे होते. नखासा परिसरात त्यांच्या आई-वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. वडिलांचे नाव किशन सिंह आणि आईचे नाव नरेनिया होते. दंगलीच्या आगीत दोघेही जळून खाक झाले. गुलाब सिंग आई-वडिलांचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी गेले असता, त्यांना फक्त वडिलांचे बूट आणि आईची बांगडी सापडली. आजूबाजूला फक्त राख होती. इतक्या निर्घृण हत्येनंतरही गुलाब सिंह यांचा एफआयआर नोंदवण्यात आला नाही. त्या हत्याकांडाच्या कटू आठवणी त्यांच्या मनात आजही घर करुन आहेत. वृद्ध गुलाबसिंग आजही ते दृश्य आठवून थरथर कापतात.
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
गुलाब सिंह यांनी 'आज तक'शी संवाद साधताना सांगितले की, त्या दिवशी आई-वडील भाचीच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. यावेळी अचानक दंगल सुरू झाली, ज्यामुळे बाजारात चेंगराचेंगरी झाली. जीव वाचवण्यासाठी अनेकजण जवळच्या कारखान्यात लपले. मात्र दंगलखोरांनी कारखान्याचे गेट तोडून आत प्रवेश केला आणि लपलेल्या सर्वांना तलवारीने कापले अन् जाळून मारले. अनेकांचे मृतदेहही हाती आले नाही, हाती आली ती फक्त राख...
दंगलीनंतर संभलमध्ये 72 तासांचा संचारबंदी लागू करण्यात आला होता, आम्ही कुठेही जाऊ शकत नव्हतो. नंतर त्याच कारखान्यात काम करणाऱ्या एका व्यक्तीकडून मला माहिती मिळाली की, माझ्या आई-वडिलांचाही दंगलीत मृत्यू झाला आहे. जीव मुठीत ठेवून मी कारखान्यात गे,लो तेव्हा मला माझ्या वडिलांचा एक बूट आणि माझ्या आईची एक बांगडी सापडली. त्यांच्या शरीराची राख झाली होती. 1978 च्या दंगलीत एकूण 184 लोक मारले गेले होते. ही दंगल इतकी भयंकर होती की, हिंदू समाज संभलमधून स्थलांतरित झाला. आज लोकसंख्या 45 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आली आहे.