CISF जवानांनी छापा टाकून केली व्यापाऱ्याच्या घरी लूट; सावत्र आईच निघाली सूत्रधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:44 IST2025-03-27T12:40:22+5:302025-03-27T12:44:41+5:30

कोलकातामध्ये सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी बनावट छापा टाकत व्यापाऱ्याच्या मुलीला लुटलं.

Fake IT raid in Kolkata police arrested 8 people including 5 CISF jawans | CISF जवानांनी छापा टाकून केली व्यापाऱ्याच्या घरी लूट; सावत्र आईच निघाली सूत्रधार

CISF जवानांनी छापा टाकून केली व्यापाऱ्याच्या घरी लूट; सावत्र आईच निघाली सूत्रधार

Kolkata Crime: कोलकातामध्ये एका व्यापाऱ्यावर छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलिसांना अटक केली आहे. छापा टाकणारे अधिकारी हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. जवानांनी बनावट छापा टाकून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो फसला. पोलिसांनी या प्रकरणात एकूण आठ लोकांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा कट व्यापाऱ्याच्या सावत्र आईनेच रचल्याचे उघड झालं. कोलकाता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कोलकाता पोलिसांनी एका व्यावसायिकाच्या घरावर बनावट आयकर छापा टाकून रोख रक्कम आणि दागिने लुटणाऱ्यांना अटक केली आहे. यामध्ये पाच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांचाही समावेश आहे. १८ मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चिनार पार्क परिसरात हा सगळा प्रकार घडला. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर व्यापाऱ्याच्या मुलीने याप्रकरणी कोलकाता पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास करत आरोपींना अटक केलीय.

कसा पडला छापा?

प्राप्तिकर अधिकारी असल्याचे भासवत आरोपी व्यापाऱ्याच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी त्यांची मुलगी विनीता सिंह मुलीसह तिथे होत्या. विनीता यांनी दरवाजा उघडताच आरोपी आत शिरले आणि त्यांनी घरातील सर्वांचे मोबाईल हिसकावून घेतले. यानंतर ते व्यावसायिकाच्या पत्नीच्या खोलीत पोहोचले आणि तिथून ३ लाख रुपये रोख आणि २५ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले. याशिवाय घरात लावलेला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही काढून घेतला. आरोपींनी धाड मारल्याचा कोणताही पुरावा शिल्लक ठेवला नाही.

या छापेमारीदरम्यान आरोपी व्यावसायिकाची दुसरी पत्नी आरती सिंह हिच्या खोलीत गेले मात्र त्यांनी तेथून काहीही घेतले नाही. विनिता सिंह यांना ही बाब संशयास्पद वाटली. त्यांनी प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्या विभागाने छापा टाकला नसल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी बागईहाटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासून आरोपी आलेल्या गाडीचा नंबर शोधून काढला. त्यावरुन चालक दीपक राणा याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने संपूर्ण कटाचा खुलासा केला.

तपासादरम्यान, विनीता सिंह आणि तिची सावत्र आई आरती सिंह यांच्यातील संपत्तीच्या वादातून हा संपूर्ण कट रचण्यात आल्याचे समोर आलं. विनीता सिंहचा वडिलांच्या मृत्यूनंतर तिची सावत्र आई आरती सिंगसोबत मालमत्तेचा वाद होता. त्यानंतर आरती सिंहने तिच्या एका नातेवाईकामार्फत सीआयएसएफचे निरीक्षक अमित कुमार सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि छाप्यात कल्पना आखली. छाप्यात सापडलेली रक्कम अर्धी वाटून घेऊ असं आरती सिंहने सांगितले. त्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी धाड टाकली.
 

Web Title: Fake IT raid in Kolkata police arrested 8 people including 5 CISF jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.