ऑनलाइन व्हिडिओ पाहून घरच्या प्रिंटरवर छापल्या बनावट नोटा; पोलिसांनी तरुणाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 20:55 IST2025-11-16T20:52:33+5:302025-11-16T20:55:48+5:30
Fake Currency: आरोपीच्या घरातून लाखो रुपयांच्या नोटा आणि साहित्य जप्त.

ऑनलाइन व्हिडिओ पाहून घरच्या प्रिंटरवर छापल्या बनावट नोटा; पोलिसांनी तरुणाला घेतले ताब्यात
Fake Currency: घरातील प्रिंटरचा वापर सामान्यतः कागदपत्रे, फोटो किंवा स्कॅन-कॉपीसाठी केला जातो; मात्र भोपाळमध्ये एका 21 वर्षीय तरुणाने याच प्रिंटरचा वापर करून बनावट नोटा छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात नोटा छापण्याचे साहित्य आणि बनावट चलन जप्त करण्यात आले आहे.
2.25 लाखांच्या बनावट नोटांसह उपकरणे जप्त
पोलिसांनी आरोपीच्या घरातून 2 लाखांहून अधिक किमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा, कॉम्प्युटर आणि प्रिंटर, पंचिंग मशीन, नोट कटिंग डाई, डिंक, स्क्रीन प्लेट, कटर, स्टील स्केल विशेष कागद, डॉट-स्टेपिंग फाइल इत्यादी साहित्य जप्त केले. विशेष म्हणजे, आरोपी पूर्वी एका प्रिंटिंग प्रेसमध्ये कामला होता, त्यामुळे रंगांच्या छटा आणि कटिंगचे तंत्र त्याला चांगले अवगत होते.
असा झाला खुलासा...
अॅडिशनल डीसीपी (झोन-2) गौतम सोलंकी यांनी सांगितले की, 14 नोव्हेंबर रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, काळा शर्ट घातलेला तरुण निजामुद्दीन परिसरात 500 रुपयांच्या बनावट नोटा बाजारात फिरवण्याच्या प्रयत्नात आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याने स्वतःचे नाव विवेक यादव असे सांगितले. त्याच्याकडे 500 रुपयांच्या 23 बनावट नोटा सापडल्या, ज्या दिसायला अगदी खऱ्या वाटत होत्या. कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ऑनलाइन व्हिडिओ पाहून घेतली ट्रेनिंग
मोबाइल तपासताना पोलिसांना बनावट नोट तयार करण्याचे अनेक ऑनलाइन व्हिडिओ आढळले. आरोपीने कबूल केले की, तो हे व्हिडिओ पुन्हा-पुन्हा पाहून संपूर्ण प्रक्रिया शिकला. त्याने ऑनलाइन विशेष कागद मागवला, ब्लेडने कागदाची काटेकोर कटिंग केली, पेंसिलने अचूक मार्किंग केले, आरबीआय स्ट्रिपची नक्कल चिकटवली, नोटेचे डिझाइन प्रिंट करून वॉटरमार्क लावला आणि अशा प्रकारे बनावट नोटा तयार केल्या.
बाजारात 5-6 लाखांचे खोट्या नोटा फिरवल्याची कबुली
पोलिसांच्या म्हणण्यानुसार यादवने या नोटा बनवल्यानंतर वेगवेगळ्या भागात जाऊन त्या नोटांनी किरकोळ वस्तू खरेदी केल्या. चौकशीत त्याने बाजारात 5-6 लाख रुपयांच्या बनावट नोटा फिरवल्याची कबुली दिली आहे. त्याच्या घरातून पोलिसांना 500 रुपयांच्या 428 बनावट नोटा सापडल्या, ज्यांची एकूण किंमत ₹2,25,500 होती.