'पद्मावती'चा वाद चिघळला, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 03:04 PM2017-11-17T15:04:02+5:302017-11-17T15:07:32+5:30

राजस्थानमध्ये या चित्रपटाला जास्त विरोध होत आहे. येथील चित्तौडगडमध्ये विरोध प्रदर्शन करणा-या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. दरम्यान, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. 

Failure of 'Padmavati', firing in police air to disperse agitators | 'पद्मावती'चा वाद चिघळला, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

'पद्मावती'चा वाद चिघळला, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

Next
ठळक मुद्दे'पद्मावती'चा वाद चिघळला. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार.पद्मावतीला विविध संघटनांचा विरोध.

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षीत  पद्मावती चित्रपटाला मोठ्याप्रमाणात विरोध होताना दिसत आहे. राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये चित्रपटाविरोधात सर्वात जास्त रोष पहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये या चित्रपटाला जास्त विरोध होत आहे. येथील चित्तौडगडमध्ये विरोध प्रदर्शन करणा-या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. दरम्यान, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. 
चित्तौडगडवरील मुख्य दरवाज्या बंद करण्याचा प्रयत्न यावेळी आंदोलकांनी केला. त्यानंतर पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला. याचबरोबर, पद्मावती या चित्रपटाला विरोध दर्शविण्यासाठी अनेक संघटना याठिकाणी शस्त्रास्त्र घेऊन आल्याचे समजते. 




करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र नाथ यांनीही काल लखनऊ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली.  पद्मावती हा चित्रपट हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे. त्यासाठी भन्साळींना दुबईतून पैसा मिळाला आहे. दाऊद इब्राहिमने त्यांना दुबईमार्गे पैसा पुरवला आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाक कापण्याची जाहीर धमकी सुद्धा त्यांनी यावेळी दिली. याचबरोबर, उत्तर प्रदेशातील एका राजपूत नेत्याने अशी घोषणा केली आहे की, जो व्यक्ती  पद्मावती  चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीली भन्साळी यांचे शीर कापून आणेल, त्याला 5 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.




1  डिसेंबर 2017 रोजी पद्मावती चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन आणि अभिनेता शाहिद कपूर हा राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. तसेच, अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. तर, या या चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.

पद्मावतीला कोणीही रोखू शकणार नाही - दीपिका पदुकोण
चित्रपट प्रदर्शित होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत, असे अभिनेत्री दीपिका पदुकोणने गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटले होते. तसेच, हा चित्रपट ठरल्यानुसार 1 डिसेंबरला प्रदर्शित होईल, असा विश्वास सुद्धा तिने व्यक्त केला होता.

पद्मावतीला विविध संघटनांचा विरोध...
 पद्मावती  या चित्रपटला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. जयपूरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्साळींना मारहाणही करण्यात आली होती. महाराणी पद्मावतीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तसेच या चित्रपटातून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.

Web Title: Failure of 'Padmavati', firing in police air to disperse agitators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.