"सगळे मेलेत, मीसुद्धा थोड्या वेळात…’’, त्या कुटुंबातील प्रमुखाने मरण्यापूर्वी प्रत्यक्षदर्शींना सांगितलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:04 IST2025-05-27T12:03:34+5:302025-05-27T12:04:08+5:30
Haryana Crime News: हरयाणामधील पंचकुला येथे एकाच कुटुंबातील सात जणांनी कारमध्ये विषप्राशन करून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील प्रमुखाने जीवन संपवण्यापूर्वी दिलेल्या माहितीबाबत स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

"सगळे मेलेत, मीसुद्धा थोड्या वेळात…’’, त्या कुटुंबातील प्रमुखाने मरण्यापूर्वी प्रत्यक्षदर्शींना सांगितलं धक्कादायक कारण
हरयाणामधील पंचकुला येथे एकाच कुटुंबातील सात जणांनी कारमध्ये विषप्राशन करून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्वजण बागेश्वर धाम यांच्या हनुमंत कथेमध्ये सहभागी होऊन माघारी परतले होते. दरम्यान, या सामूहिक आत्महत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पुनीत राणा यांनी या घटनेबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. आम्ही विषप्राशन केलं आहे, सगळे मेलेत, मीसुद्धा थोड्या वेळात मरेन, असे या कुटुंबातील प्रमुख प्रवीण मित्तल यांनी आम्हाला सांगितले, अशी माहिती राणा यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, आमच्या घराजवळ एक कार उभी आहे, तिच्यावर टॉवेल टाकलेलं आहे, अशी माहिती कुणीतरी आम्हाला दिली. त्यामुळे संशय आल्याने आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. तसेच विचारपूस केली. त्यावेळी त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असलेल्या प्रवीण मित्तल यांनी आम्हाला सांगितले की, आम्ही बाबांच्या कार्यक्रमासाठी आलो होतो. मात्र हॉटेल मिळत नसल्याने कारमध्ये झोपलोय.
तेव्हा आम्ही त्यांना ही कार तिथून हटवून दूर कुठे तरी उभी करा असे त्यांना सांगितले. तसेच आम्ही कारमध्ये डोकावून पाहिले असता त्यात इतर व्यक्ती एकमेकांवर पडलेल्या होत्या. तसेच त्यांना एकमेकांवर उलट्या केलेल्या होत्या. त्यांच्यापैकी काही जणांचा मृत्यू झालाय असं वाटत होतं. दरम्यान, आम्ही अधिक विचारपूस केल्यावर त्या कुटुंबातील प्रमुख असलेले प्रवीण मित्तल हे खाली उतरले. त्यांनी आम्हाला सांगितले की, आम्ही सगळ्यांनी सोडियम प्राशन केलं आहे. मीसुद्धा विषप्राशन केलं आहे. सगळ्यांचा मृत्यू झालाय. काही वेळात माझाही मृत्यू होईल. आम्ही खूप कर्जबाजारी झालो आहोत. आमचे नातेवाईक खूप श्रीमंत आहेत. मात्र माझी कुणी मदत केली नाही. त्यांचं म्हणणं ऐकताच आम्ही कारमधील मुलांना हलवून पाहिलं मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही.
त्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला. पोलीसही तातडीने घटनास्थळी आले. मात्र रुग्णवाहिकेला यायला उशीर झाला. जर रुग्णवाहिका वेळीच आली असती तर आतील व्यक्तींना वाचवता आले असते. त्या कुटुंबातील प्रवीण मित्तल हे कारमधून बाहेर आले होते. मात्र काही वेळातच त्यांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, उत्तराखंडमधील डेहराडून येथील रहिवासी प्रवीण मित्तल हे त्यांच्या कुटुंबासह पंचकुला येथील बागेश्वर धाम येथे आयोजित हनुमान कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर घरी परतताना त्यांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. मृतांमध्ये प्रवीण मित्तल (४२), प्रवीण यांचे पालक, प्रवीणची पत्नी आणि दोन मुली आणि एका मुलगा यांचा समावेश आहे.