ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 06:18 IST2026-01-09T06:17:50+5:302026-01-09T06:18:11+5:30
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट घटनास्थळी धाव घेतल्याने कोलकाता येथे अभूतपूर्व 'हायव्होल्टेज ड्रामा' पाहायला मिळाला.

ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
कोलकाता : तृणमूल काँग्रेसची रणनीती आखणारी संस्था ‘आयपॅक’ आणि तिचे संचालक प्रतीक जैन यांच्या ठिकाणांवर गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी पहाटे ६ वाजताच छापेमारी केली. या कारवाईनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट घटनास्थळी धाव घेत तपास अधिकाऱ्यांना अंगावर घेतल्याने कोलकाता येथे अभूतपूर्व 'हायव्होल्टेज ड्रामा' पाहायला मिळाला.
जैन यांच्या निवासस्थानी धाव घेतल्यानंतर ममता २०-२५ मिनिटे तेथे थांबल्या व हिरव्या रंगाची एक फाइल हातात घेऊन त्या बाहेर आल्या. या नंतर लगेच पत्रकार परिषद घेत त्यांनी तृणमूलची कागदपत्रे, हार्ड डिस्क आणि निवडणूक रणनीती संबंधीत सर्व डेटा केंद्र सरकारने जप्त केल्याचा आरोप केला.
ईडीने हार्ड डिस्क, मोबाइल फोन, लॅपटॉप, उमेदवारांच्या याद्या व पक्षाच्या निवडणुकीची रणनीती संदर्भातील कागदपत्रे सोबत नेली असे बॅनर्जी म्हणाल्या. राजकीय पक्षांचा डेटा गोळा करणे हे ईडीचे काम आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.
ममता आल्या अन् झाला हायव्होल्टेज ड्रामा
ईडीच्या धाडीचे वृत्त कळल्यानंतर ममता बॅनर्जी या तडक प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी व कार्यालयात पोहोचल्या. त्याआधी या भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तसेच केंद्रीय राखीव दलाचे जवानही त्या भागात उपस्थित होते. या केंद्रीय जवानांनी आयपॅकच्या कार्यालयात जाण्याचा व येण्याचा मार्ग बंद केला होता. या यंत्रणेशी चर्चा न करता बॅनर्जी थेट आतमध्ये गेल्या.
बॅनर्जी यांनी इमारतीच्या तळघरातून प्रवेश केला व लिफ्टने ११ व्या मजल्यावरील कार्यालयात पोहोचल्या. येथून पक्षासंदर्भात फायली बॅनर्जी यांच्या कारमध्ये ठेवण्यात आल्या.
कोण आहेत प्रतीक जैन?
प्रतीक जैन हे ‘इंडियन पोलिटिकल ॲक्शन कमिटी’ (आयपॅक)चे संचालक असून ही कंपनी तृणमूलला राजकीय सल्लागार सेवा देते शिवाय या पक्षाचे आयटी व मीडिया व्यवस्थापनही पाहते. याच कंपनीने २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपचे काम पाहिले होते. त्यावेळी प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतीकार ‘आयपॅक’चे काम पाहत होते.