जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:11 IST2025-05-13T11:10:49+5:302025-05-13T11:11:38+5:30
Jammu Kashmir Encounter: शोपियानच्या जम्पाथरीमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
ऑपरेशन सिंदूर थांबलेले असताना जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक सुरु झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.
शोपियानच्या जम्पाथरीमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारले आहे. देशात घुसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याची मोहिम पुन्हा वेगवान करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीर पोलिसांसोबत मिळून दहशतवाद्यांची शोधमोहिम हाती घेतली होती.
भारताने पाकिस्तानविरोधात कारवाई केल्यानंतर ही मोहीम काहीशी मागे पडली होती. सुरक्षा यंत्रणा सतर्क होत्या. आता पुन्हा एकदा कारवाई तीव्र करण्यात आली आहे. जम्पाथरीमध्ये आणखी दोन दहशतवादी लपले आहेत, त्यांच्यासोबत सैन्याची चकमक सुरु आहे. दोन्ही बाजुंनी जोरदार गोळीबार सुरु झाला आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये या दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.