कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 21:06 IST2025-10-16T21:06:29+5:302025-10-16T21:06:55+5:30
Crime News: अलवर पोलिसांनी फ्लिपकार्ट कंपनीच्या ट्रकमधून महागड्या मोबाईलची चोरी करणाऱ्या एका गँगच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीमधील ७ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ७ ऑक्टोबर रोजी चोरी केलेले २२६ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त
अलवर पोलिसांनी फ्लिपकार्ट कंपनीच्या ट्रकमधून महागड्या मोबाईलची चोरी करणाऱ्या एका गँगच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीमधील ७ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ७ ऑक्टोबर रोजी चोरी केलेले २२६ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांना आरोपींकडे १०८ मोबाईल फोन. २ अॅपल कंपनीचे टॅपटॉप. एक सॅमसंग कंपनीचा टॅब आणि चोरीमध्ये वापरण्यात आलेली एक गाडी जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत १ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले की, गुडगाव येथील रहिवासी असलेल्या लखनपाल सिंह यांनी ७ ऑक्टोबर रोजी तक्रार नोंदवली होती. आमच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक मुंबईहून दिल्लीला जात होता. त्यामधील २३४ वस्तू गायब झाल्या होत्या. यामध्ये २२१ आयफोन, दोन व्हिओ फोन, एक सॅमसंग गॅलेक्सी एस २४, दोन रेडमी फोन आणि एका हेडफोनचा समावेश आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते.
या प्रकरणी अफजल, अस्लम, सुधीर यादव, तुषार विक्रम सिंह, जयपाल यादव आणि मनीष यांना अटक केली. आरोपींकडून अॅपलचे ८८ मोबाईल आणि २० इतर कंपनीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे फ्लिपकार्ट कंपनीचा कर्मकाची असलेला लोकेश हा त्यांना ट्रक आणि त्यातील वस्तूंची माहिती द्यायचा. अटक करण्यात आलेले आरोपी हे ट्रक ड्रायव्हरचं काम करायचे तसेच आधी झालेल्या चोरीच्या घटनांमध्येही त्यांचा समावेश होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.