भारताने खडसावताच ‘एक्स’चे मस्क बॅकफूटवर; आक्षेपार्ह, अश्लील मजकूर तातडीने काढून टाकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 08:52 IST2026-01-05T08:52:47+5:302026-01-05T08:52:47+5:30
असा मजकूर आता तातडीने काढून टाकला जाणार असून, अशा लोकांची खाती कायमस्वरुपी निलंबित करण्याची घोषणा ‘एक्स’ने केली आहे.

भारताने खडसावताच ‘एक्स’चे मस्क बॅकफूटवर; आक्षेपार्ह, अश्लील मजकूर तातडीने काढून टाकणार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘ग्रोक’सारख्या स्रोतांच्या वापरातून ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होत असलेल्या आक्षेपार्ह तसेच अश्लील मजकुराबाबत भारताने तीव्र आक्षेप नोंदवून कारवाईचा इशारा देताच ‘एक्स’चे सर्वेसर्वा इलॉन मस्क बॅकफूटवर आले आहेत. असा मजकूर आता तातडीने काढून टाकला जाणार असून, अशा लोकांची खाती कायमस्वरुपी निलंबित करण्याची घोषणा ‘एक्स’ने केली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २ जानेवारी रोजी एक्सची कानउघाडणी करत ‘ग्रोक’सारख्या एआयद्वारे तयार होणाऱ्या मजकुराबाबत तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर या सोशल मीडिया प्लॅटफार्मवरील अनधिकृत व अश्लील मजकूर तत्काळ हटवला जाणार असल्याचे ‘एक्स’च्या ग्लोबल गव्हर्नमेंट अफेअर्स खात्याकडून स्पष्ट करण्यात आले. यासोबत आक्षेपार्ह मजकूर तयार करणाऱ्या किंवा अपलोड करणाऱ्या लोकांची खाती कायमस्वरुपी निलंबित करणार असल्याचा इशारा एक्सने दिला आहे.
ग्रोकचा गैरवापर करणाऱ्यास बेकायदा मजकूर तयार करणाऱ्यांप्रमाणेच शिक्षा होईल, असा दावा इलॉन मस्क यांनी केला होता. मस्क यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित खात्यावर कायमस्वरुपी बंदी घातली जाणार असे ग्लोबल गव्हर्नमेंट अफेअर्सने नमूद केले.
अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, 'एक्स'चा दावा
बेकायदा सामग्रीवर ज्यात बाल लैंगिक शोषण सामग्रीचा समावेश आहे, त्यावर आम्ही कारवाई करतो. ती सामग्री आम्ही काढून टाकतो. तसेच संबंधित खाते कायमचे बंद करतो. गरज पडल्यास स्थानिक सरकारसोबत किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसोबत काम करतो. त्यामुळे जो कोणी बेकायदा मजकूर तयार करण्यासाठी ग्रोकचा वापर करेल, त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा दावा एक्सने केला आहे.