Elections: "आम्ही आता यांना हा खेळ खेळू देणार नाही"; अखिलेश यादवांचा कोणत्या गोष्टीला विरोध?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 13:44 IST2025-11-15T13:43:18+5:302025-11-15T13:44:29+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. अखिलेश यादव यांनीही आता सावध भूमिका घेतली आहे.

Elections: "आम्ही आता यांना हा खेळ खेळू देणार नाही"; अखिलेश यादवांचा कोणत्या गोष्टीला विरोध?
Akhilesh Yadav Bihar Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने विरोधकांना धक्का बसला आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने बिहारमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप आणि नितीश कुमारांच्या जेडीयूनेच १७४ जागा जिंकल्या आहेत. या निकालावर बोलताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने बोट दाखवले आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव बिहारच्या निकालावर बोलताना SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आहे. एसआरआयमुळेच बिहारमध्ये हा खेळ झाला असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. हे आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले.
अखिलेश यादव एसआरआयबद्दल काय बोलले?
सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, "बिहारमध्ये जो खेळ एसआरआयने केला आहे, तो पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी आता होणार नाही. कारण या निवडणूक कटाचा भांडाफोड झाला आहे. आता आम्ही हा खेळ यापुढे यांना (निवडणूक आयोग) खेळू देणार नाही. सीसीटीव्ही प्रमाणेच आमची पीपीटीव्ही म्हणजे पीडीए कार्यकर्ता सतर्क राहून भाजपचे मनसुबे हाणून पाडेल. भाजप पक्ष नाही छळ आहे", अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.
बिहारमध्ये भाजपने फक्त १२ जागा गमावल्या
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने १०१ जागा लढवल्या होत्या. भाजपला १२ जागांवरच पराभव स्वीकारावा लागला आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूलाही मोठे यश मिळाले आहे. जेडीयूनेही १०१ जागा लढवल्या होत्या. त्यांनी ८५ जागा जिंकल्या आहेत.
तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला फार चांगली कामगिरी करता आली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत ७५ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाला यावेळी फक्त २५ जागांवरच विजय मिळवता आला आहे. काँग्रेसनेही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत खराब कामगिरी केली आहे. १९ जागा काँग्रेसने २०२० मध्ये जिंकल्या होत्या. यावेळी फक्त ६ जागा काँग्रेसला जिंकता आल्या आहेत.