UP Election 2022: यूपीच्या रणांगणात अमित शाह उतरणार; भाजपा ३०० हून जास्त जागा जिंकण्याचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 22:38 IST2022-01-16T22:37:46+5:302022-01-16T22:38:05+5:30
आगामी काळात स्वत: भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शाह फ्रंटवर राहून निवडणुकीच्या मैदानात बाजी जिंकवण्यासाठी रणनीती आखणार आहेत

UP Election 2022: यूपीच्या रणांगणात अमित शाह उतरणार; भाजपा ३०० हून जास्त जागा जिंकण्याचा प्लॅन
लखनऊ – उत्तर प्रदेशात एकापाठोपाठ एक बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपाचे चाणक्य अमित शाह २३ जानेवारीनंतर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात त्या विधानसभेवर जास्त लक्ष केंद्रीत केले जाणार आहे ज्याठिकाणी स्वामी प्रसाद मौर्य आणि दारा सिंह यांच्यासारख्या नेत्यांचा प्रभाव आहे. या भाजपा नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात पक्षाची साथ सोडत समाजवादी पक्षात प्रवेश घेतला. त्यामुळे भाजपाला काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपाकडे प्लॅन B
विशेष म्हणजे निवडणूक आयोगाकडून सध्या कुठल्याही प्रकारची रॅली अथवा रोड शो ला परवानगी नाही. परंतु भाजपानं यासाठीही प्लॅन B तयार ठेवला होता. जर मोठ्या रॅलीला परवानगी नसेल तर छोट्या छोट्या रॅली काढल्या जातील. इतकचं नाही तर अमित शाह उत्तर प्रदेश आयोगाच्या निर्देशानुसार इंडोर रॅली काढण्याच्या तयारीत आहेत. परंतु कोरोना प्रोटोकॉल आणि निवडणूक आयोगाचे निर्देश यांचे पालन करतच अमित शाह त्यांचा दौरा पूर्ण करणार आहेत.
अमित शाह यांच्या दौऱ्यानं हे स्पष्ट होतंय की, आगामी काळात स्वत: भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शाह फ्रंटवर राहून निवडणुकीच्या मैदानात बाजी जिंकवण्यासाठी रणनीती आखणार आहेत. पक्षातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांमुळे पक्षाला नुकसान होणार नाही असंही काही नेते दावा करत आहे. कारण मागील ५ वर्षात भाजपानं पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांप्रमाणे इतर नेतृत्व तयार करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळेच नाराज होत स्वामी प्रसाद मौर्य आणि दारा सिंह चौहान यासारख्या नेत्यांना अडचण झाली.
भाजपाला मिळणार बहुमत?
भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने दावा केलाय की, उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा ३०० हून अधिक जागा जिंकणार आहे. पार्टीच्या मते, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील वातावरणावरुन भाजपा मागील वेळसारखं या दोन्ही टप्प्यात ८३ हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळेच विजयाचा आकडा यंदा ३०० हून अधिक जाईल असं म्हटलं जात आहे. पार्टीनुसार जनता २००७, २०१२ आणि २०१७ प्रमाणे २०२२ मध्येही उत्तर प्रदेशात बहुमत भाजपाकडे असेल असा दावा करण्यात येत आहे.