UP Election 2022: अखिलेश यादव विष्णूचा अवतार, ते मुख्यमंत्री बनेपर्यंत अन्नप्राशन नाही करणार, या कुटुंबाने केला पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 21:00 IST2022-01-16T20:58:12+5:302022-01-16T21:00:51+5:30
Uttar Pradesh Assembly Election 2022: समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव हे भगवान विष्णूंचा अवतार असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी भगवान विष्णूसोबत तुलना करत या कुटुंबाने Akhilesh Yadav यांच्या फोटोची पूजा सुरू केली आहे. काही महिलाही या पूजेमध्ये सहभागी होत आहेत.

UP Election 2022: अखिलेश यादव विष्णूचा अवतार, ते मुख्यमंत्री बनेपर्यंत अन्नप्राशन नाही करणार, या कुटुंबाने केला पण
लखनौ - उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगतदार होऊ लागली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपलाच विजय होणार असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे पक्षाच्या समर्थकांनीही आपल्या नेत्यांच्या विजयासाठी वेगवेळ्या माध्यमातून पूजापाठ सुरू केले आहेत. असाच एक प्रकार बाराबंकी येथून समोर आला आहे. येथे समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी आपल्या घरी अखिलेश यादव आणि मुलायमसिंग यादव यांचा फोटो देवघरात स्थापन करून पूजा सुरू केली. तसेच ही पूजा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत सुरू राहील, असं स्पष्ट केलं आहे.
हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील कुर्सी विधानसभा मतदारसंघामधील काकरिया गावातील आहे. जिथे एका कुटुंबाने सपाचे प्रमुख अखिलेश यादव हे भगवान विष्णूंचा अवतार असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी भगवान विष्णूसोबत तुलना करत या कुटुंबाने अखिलेश यादव यांच्या फोटोची पूजा सुरू केली आहे. काही महिलाही या पूजेमध्ये सहभागी होत आहेत.
या लोकांच्या मते भगवान विष्णू अखिलेश यादव यांच्या रूपात कलियुगामध्ये अवतरीत झाले आहेत. तसेच निवडणुकीनंतर त्यांचं सरकार स्थापन होणं निश्चित आहे. जोपर्यंत त्यांचे सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत या घरात अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यांची पूजा सुरू राहणार असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये भगवान विष्णूचा अवतार असलेल्या अखिलेश यादव यांचे सरकार स्थापन होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जोपर्यंत राज्यात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत अन्नाचा त्याग करण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला आहे. जोपर्यंत अखिलेश यादव यांच सरकार येत नाही तोपर्यंत आम्ही अन्नग्रहण करणार नाही, केवळ फले खाऊन राहू, असे या कुटुंबातील महिलांनी सांगितले.