नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना ईडीकडून समन्स; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 06:33 IST2022-06-02T06:33:23+5:302022-06-02T06:33:28+5:30

हे तर केंद्रातील मोदी सरकारचे कारस्थान; काँग्रेसची खरमरीत टीका

ED summons Congress Chief Sonia Gandhi and Congress Leader Rahul Gandhi in National Herald case | नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना ईडीकडून समन्स; काँग्रेसची टीका

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना ईडीकडून समन्स; काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र व काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावले आहे. 
राहुल गांधी यांनी आज, गुरुवारी (दि.२ जून) व सोनिया गांधी यांनी ८ जूनला ईडीच्या मध्य दिल्लीतील मुख्यालयात हजर राहावे असे या समन्समध्ये म्हटले आहे.

देशाची दिशाभूल करण्यासाठी केंद्र  सरकारने रचलेले हे कारस्थान आहे, अशी टीका काँग्रेसने समन्स प्रकरणावर केली आहे. काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य देतील. विदेश दौऱ्यावर असल्याने आपल्याला ५ जूननंतर चौकशीला बोलाविण्यात यावे असे पत्र राहुल गांधी यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना लिहिले आहे. 

खरगे, बन्सल यांची आधीच चौकशी

नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राचे मालक असलेल्या यंग इंडियन या संस्थेवर गैरव्यवहारांचे आरोप झाले आहेत. तेथील मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीला सोनिया व राहुल गांधी यांचे जबाब नोंदवून घ्यायचे आहेत. नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडून प्रसिद्ध केले जाते. या वृत्तपत्रातील गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, पवन बन्सल यांची ईडीने नुकतीच चौकशी केली होती. 

लोकशाहीवरील हल्ला : सुरजेवाला
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ईडीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांना पाठविलेले समन्स हे केंद्र सरकारच्या डावपेचांचा भाग आहे. या संकटावर काँग्रेस पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळाच्या आधारे निश्चित मात करेल. लोकशाहीवरील हा हल्ला आम्ही परतवून लावू. 

सोनिया गांधी, राहुल गांधी यंग इंडियनचे प्रवर्तक

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ मध्ये केलेल्या तक्रारीनंतर नॅशनल हेरॉल्डमधील आर्थिक व्यवहारांबाबत प्राप्तिकर खात्याने चौकशी केली. त्याची न्यायालयाने दखल घेतली होती. त्यानंतर ईडीने मनी लाँडरिंगविरोधी कायद्यानुसार नव्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी हे यंग इंडियनचे प्रवर्तक व समभागधारक आहेत.

‘गैरकृत्य केले नसेल तर चिंता कशाला’

केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले की, नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविल्याने सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी चिंता करण्याचे कारण नाही. जर त्या दोघांनी काहीही चुकीचे कृत्य केले नसेल तर त्यांनी चिंता करू नये. काँग्रेस नेत्यांनी यावर संतप्त केला होता. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर किशन रेड्डी यांनी ही प्रतिक्रिया दिली.

नॅशनल हेरॉल्डसारख्या खोट्या प्रकरणांत गुन्हे दाखल करून मोदी सरकारच्या हाती काहीही लागणार नाही. या सरकारचे कारस्थान कदापिही यशस्वी होणार नाही. 
    - अभिषेक मनू सिंघवी 

Web Title: ED summons Congress Chief Sonia Gandhi and Congress Leader Rahul Gandhi in National Herald case