बिहारच्या राजकारणात भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर जाणार; राज्यात नवं सरकार बनणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 11:28 IST2026-03-05T11:25:57+5:302026-03-05T11:28:31+5:30
नितीश कुमार त्यांचा मुलगा निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवतील आणि मुख्यमंत्रिपद भाजपाला देतील अशी राजकीय चर्चा सुरू आहे.

बिहारच्या राजकारणात भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर जाणार; राज्यात नवं सरकार बनणार
पटना - बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे वळण येणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. गुरुवारी ते राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असल्याने बिहारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार आहेत. यावेळी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हेदेखील उपस्थित राहतील.
नितीश कुमार त्यांचा मुलगा निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवतील आणि मुख्यमंत्रिपद भाजपाला देतील अशी राजकीय चर्चा सुरू आहे. नितीश कुमार यांनी ट्विट करून राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. नितीश कुमार म्हणाले की, मागील २ दशकाहून अधिक काळ माझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला, माझ्यासोबत उभे राहिले. त्याच जोरावर मी बिहारच्या लोकांची सेवा केली. तुमचा विश्वास आणि पाठिंबा यावर बिहार आज विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. संसदीय जीवनाची सुरुवात करताना माझ्या मनात एक इच्छा होती. बिहारच्या विधिमंडळासोबत मला संसदेतील दोन्ही सभागृहाचा सदस्य व्हायचे होते. त्यामुळे यंदा होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मी सदस्य बनू इच्छितो असं त्यांनी सांगितले.
पिछले दो दशक से भी अधिक समय से आपने अपना विश्वास एवं समर्थन मेरे साथ लगातार बनाए रखा है, तथा उसी के बल पर हमने बिहार की और आप सब लोगों की पूरी निष्ठा से सेवा की है। आपके विश्वास और समर्थन की ही ताकत थी कि बिहार आज विकास और सम्मान का नया आयाम प्रस्तुत कर रहा है। इसके लिए पूर्व में…
— Nitish Kumar (@NitishKumar) March 5, 2026
तसेच मी पूर्ण प्रामाणिकपणे विश्वासही देतो, तुमच्याशी भविष्यातही तितकाच संबंध कायम ठेवेन. तुमच्या साथीने विकसित बिहार बनवण्याचा संकल्प कायम आहे. राज्यात जे नवे सरकार बनेल त्यांना माझा पाठिंबा आणि मार्गदर्शन देत राहीन असा विश्वासही नितीश कुमार यांनी व्यक्त केला आहे.
४ महिन्यातच नितीश कुमारांचा राजीनामा?
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर २० नोव्हेंबरला नितीश कुमार यांनी पटना येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. बिहारमध्ये १० वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. बिहारमध्ये दीर्घ काळ त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवले. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र आता ४ महिन्यानंतर बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होत असल्याचे दिसते. ४ महिन्यातच मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देऊन राज्यसभेवर जात असल्याची घटना घडत आहे.