एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:31 IST2025-07-15T17:29:55+5:302025-07-15T17:31:08+5:30
Lifestyle News: गेल्या काही वर्षांमध्ये तरुणाईची जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे. यापैकी अनेकांना लठ्ठ पगार आहे. मात्र ते जीवनात फारसे खूश नाही आहे. अशाच एका तरुणाने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे.

एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...
गेल्या काही वर्षांमध्ये तरुणाईची जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे. यापैकी अनेकांना लठ्ठ पगार आहे. मात्र ते जीवनात फारसे खूश नाही आहे. अशाच एका तरुणाने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. एका भारतीय स्टार्टअपचा संस्थापक असलेल्या या २८ वर्षीय तरुणाने रेडिटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणाला की, मी वर्षाला एका कोटी रुपयांची कमाई करूनही दु:खी आहे. मी प्रत्येकवेळी तणावाखाली असतो. तसेच माझी प्रकृतीही ठीक नसते. आता या तरुणाच्या पोस्टवर लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तसेच त्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
रेडिटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये या तरुणाने आपला जीवन प्रवास थोडक्यात मांडला आहे. त्यात त्याने आपण इथपर्यंत कसे पोहचलो हे सांगितले आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. बारावीनंतर मी शिष्यवृत्ती मिळवून सीएचा अभ्यास सुरू केला. २०१७ मध्ये मी एक लाख रुपयांची गुंतवणूक करून स्टार्टअप सुरू केले. मात्र ते अयशस्वी ठरले. पुढे २०२० मध्ये कोरोनादरम्यान, माझी सीएची फायनल परीक्षा होती. मात्र परीक्षा स्थगित झाली. त्यानंतर मी एक ऑनलाईन व्यवसाय सुरू केला. तसेच एकही रुपया न गुंतवता केवळ इन्स्टाग्रामवर मार्केटिंग करून मी दरमहा १ ते २ लाख रुपये कमाई करू लागलो. सध्याचं बोलायचं झाल्यास मी अनेक व्यवसाय सुरू केले आहे. जून महिन्यात दुबईमध्येही व्यवसास सुरू केला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मी स्वत:च्या खिशातून एकही रुपया न गुंतवता आणि कुणाकडूनही कर्ज न घेता हे व्यवसाय सुरू केले आहेत.
दरम्यान, या तरुण व्यावसायिकाने या पोस्टसोबत त्याच्या साध्याशा बेडरूमचा फोटो शेअर केला आहे. त्यावर एका व्यक्तीने खूश आहात का? असा प्रश्न विचारला. तेव्हा या तरुण व्यावसायिकाने त्याला भावूक करणारं उत्तर दिलं. तो म्हणाला की, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. खरं सांगायचं तर मी खूप आनंदी नाही आहे. मी आधी खूप आनंदी होतो. आता मी नेहमी तणावाखाली असतो. तब्येतही फारशी बरी नसते. माझ्याकडे पैसा आहे. पण वेळ नाही. काम खूप असल्याने कुठे लांब फिरायला जाता येत नाही.
मात्र असं असलं तरी माझ्या आई-वडिलांना माझा अभिमान वाटतो. आता खरेदी करताना मला पैशांचा विचार करावा लागत नाही. पैसा हा सुरक्षेची जाणीव करून देतो, असेही त्याने नमूद केले.