९०० वर्षांच्या दुष्काळामुळे सिंधू संस्कृती लयास गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:41 IST2018-04-16T23:41:33+5:302018-04-16T23:41:33+5:30
सलग ९०० वर्षे पडलेल्या भीषण दुष्काळामुळे सुमारे ४,३५० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती अस्ताला गेली, असा निष्कर्ष खडगपूर आयआयटीच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती काढला आहे. त्यावेळी २०० वर्षे दुष्काळ पडला होता हा आजवरचा समजही यामुळे चुकीचा ठरला आहे.

९०० वर्षांच्या दुष्काळामुळे सिंधू संस्कृती लयास गेली
खडगपूर : सलग ९०० वर्षे पडलेल्या भीषण दुष्काळामुळे सुमारे ४,३५० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती अस्ताला गेली, असा निष्कर्ष खडगपूर आयआयटीच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती काढला आहे. त्यावेळी २०० वर्षे दुष्काळ पडला होता हा आजवरचा समजही यामुळे चुकीचा ठरला आहे.
खडगपूर आयआयटीच्या भूगर्भशास्त्र व भूभौतिकी विभागातील संशोधकांनी केलेल्या या संशोधनाचा शोधनिबंध ‘एल्सविर क्वार्टर्ली इंटरनॅशनल जर्नल’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकात याच महिन्यात प्रसिद्ध केला जाणार आहे.
या अभ्यासात वैज्ञानिकांनी पाच हजार वर्षांच्या कालखंडातील पाऊसमानातील बदलांचा अभ्यास केला. सिंधू नदीसमुहातील नद्यांचा मुख्य जलस्रोतातूनच लेह-लडाखमधील त्सो मोरिरी सरोवरासही पाणी मिळते. आयआयटीच्या वैज्ञानिकांनी त्या भागातील पाऊसपाण्याच्या प्रमामाचाही पाच हजार वर्षांच्या कालखंडाचा अभ्यास केला आणि पाऊस केव्हा समाधानकारक झाला, केव्हा कमी झाला किंवा केव्हा अजिबात गायब झाला याचे काळ निश्चित केले. भूगर्भशास्त्र विभागातील
ज्येष्ठ अध्यापक आणि या संशोधकांच्या चमूचे नेते डॉ.अनिल कुमार गुप्ता यांनी सांगितले की, ख्रिस्तपूर्व २,३५० ते १,४५० (सुमारे ४,३५० वर्षांपूर्वी) या कालखंडात सिंधू संस्कृतीच्या प्रदेशात पाऊस खूपच कमी झाल्याने भाषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. (वृत्तसंस्था)
रहिवाशांचे पूर्व तसेच दक्षिणेकडे स्थलांतर
वायव्य हिमालयात पावसाने सुमारे ९०० वर्षे दडी मारल्याने सिंधू संस्कृती ज्या नद्यांच्या काठांवर विकसित झाली होती त्या पार आटून गेल्या. यामुळे या नगरांमध्ये एरवी कणखरपणे वास्तव्य करून राहिलेल्यांना नाईलाजाने जेथे पाऊसपाणी बरे होते अशा पूर्व व दक्षिणेकडे स्थलांतर करावे लागले.