DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:53 IST2025-12-31T14:51:53+5:302025-12-31T14:53:38+5:30
26 वर्षांपूर्वी आपले रक्त देऊन जीव वाचवणाऱ्या संतु मास्टरच्या घरी DSP संतोष पटेल, मुलीचे लग्न थाटामाटात लावणार!

DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
Madhya Pradesh: पद, प्रतिष्ठा आणि अधिकार मिळाले तरी माणुसकी आणि उपकारांची आठवण कधी विसरू नये, हे मध्य प्रदेशपोलिस विभागातील संवेदनशील अधिकारी संतोष पटेल (DSP) यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. बालपणी आपला जीव वाचवण्यासाठी रक्तदान करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याच्या (संतु मास्टर) कुटुंबाला भेटण्यासाठी ते सतना येथील झोपडपट्टीत पोहोचले अन् 26 वर्षांपूर्वीचे ‘रक्ताचे ऋण’ फेडण्याचा संकल्प केला.
DSP झाल्यावर उपकाराची परतफेड
मध्य प्रदेशपोलिस विभागात पोलिस उप-अधिक्षक पद मिळाल्यानंतर संतोष पटेल सर्वप्रथम सतन्यातील त्याच रुग्णालयात गेले, जिथे बालपणी त्यांचे प्राण वाचले होते. त्यांना 26 वर्षांपूर्वी रक्त दिलेल्या संतु मास्टर यांना भेटून मिठी मारायची होती, मात्र तिथे गेल्यावर कळले की, संतु मास्टर आणि त्यांची पत्नी दोघांचेही निधन झाले आहे. रुग्णालयातील एका ज्येष्ठ कर्मचाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली आणि संतु मास्टर यांच्या दोन मुली झोपडपट्टीत राहतात, हे समजताच थेट त्यांच्या घरी पोहोचले.
1999 में बाबाओं की झाड़ फूंक ने मुझे मृत्यु शैय्या में पहुँचा दिया था तब सतना के बिरला अस्पताल में भर्ती किया। खून न मिलने से ऑपरेशन नहीं हो रहा था तब सफ़ाई कर्मी संतु मास्टर ने ब्लड दिया। 26 साल बाद खोजा तो वो इस दुनिया में नहीं थे। हमने संकल्प लिया है कि बेटी का कन्यादान करेंगे pic.twitter.com/mjwUGtLCHP
— Santosh Patel DSP (@Santoshpateldsp) December 29, 2025
1999 ची आठवण: रक्ताविना शस्त्रक्रिया अशक्य
संतोष पटेल यांनी त्या दिवसांची आठवण सांगितली. 1999 साली, ते अवघे 8-9 वर्षांचे असताना गंभीर आजाराने ग्रस्त होते. उपचारासाठी घरच्यांनी सहा महिने 'झाड-फुंक' केले, मात्र प्रकृती आणखी खालावल्यावर पन्ना जिल्हा रुग्णालय आणि नंतर सतन्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया आणि रक्ताची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट केले.
रक्तदानाबाबत गैरसमज; सफाई कर्मचाऱ्याने पुढाकार घेतला
त्या काळात रक्तदानाबाबत अनेक गैरसमज असल्याने कोणीही पुढे येत नव्हते. याच दरम्यान एक विलक्षण योग जुळून आला. रुग्णालयात साफसफाई करणारे संतु मास्टर यांनी संतोष यांच्या वडिलांना धीर दिला. मुलाला रक्ताची गरज असल्याचे समजताच संतु मास्टर यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता स्वतःचे रक्त दिले. त्या रक्तामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आज संतोष पटेल जिवंत आहेत, DSP म्हणून सेवेत आहेत.
अधिकारी म्हणून नाही, मुलगा म्हणून आलोय
झोपडीत आलेल्या पोलिस अधिकाऱ्याला पाहून संतु मास्टर यांच्या मुली घाबरल्या; पण DSP संतोष पटेल यांनी नतमस्तक होत त्यांच्या चरणांना स्पर्श केला. क्षणातच वातावरण भावूक झाले. ते म्हणाले, मी संतु मास्टर यांना भेटू शकलो नाही, याची खंत आयुष्यभर राहील. पण माझ्या शरिरात त्यांचे रक्त वाहते.
कुटुंबाची जबाबदारी; कन्यादानाचा संकल्प
DSP संतोष यांनी कुटुंबाला आश्वस्त केले की, ते एकटे नाहीत. संतु मास्टर यांच्या धाकट्या मुलीचा विवाह थाटामाटात करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. वेळ आणि संयोग जुळला तर मी भाऊ आणि वडील या नात्याने कन्यादानही करीन, असा शब्दही त्यांनी दिला.