देवदूत ठरला बस चालक; हृदयविकाराचा झटका येऊनही चालकाने वाचवला ५० विद्यार्थ्यांचा जीव, मोठा अपघात टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:56 IST2025-11-11T15:50:16+5:302025-11-11T15:56:32+5:30
आंध्र प्रदेशमध्ये एका बस चालकाने ५० विद्यार्थ्यांचा जीव वाचवला आहे.

देवदूत ठरला बस चालक; हृदयविकाराचा झटका येऊनही चालकाने वाचवला ५० विद्यार्थ्यांचा जीव, मोठा अपघात टळला
Andhra Pradesh Bus Accident: गेल्या काही दिवसांत देशभरात झालेल्या बस अपघातांमुळे प्रवाशांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच कर्तव्यासमोर स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या एका बस चालकाच्या शौर्यामुळे सोमवारी सकाळी ५० शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव वाचला. आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली.
राजमहेन्द्रवरम येथील गेट्स इंजिनिअरिंग कॉलेजची बस चालवणारे देंदुकूरी नारायण राजू (६०) यांना ड्युटीवर असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच, त्यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला घेऊन सुरक्षितपणे थांबवली आणि त्यानंतर ते बसमधून बाहेर पडले. बाहेर पडताच हायवेवरील दुभाजकावर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रसंगावधानामुळे ५० विद्यार्थ्यांचे प्राण वाचले
ही घटना आलमुरू मंडलातील माडिकी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली. राजू हे माडिकी गावचेच रहिवासी होते. महामार्गावर बसमध्ये असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, त्यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता, अत्यंत गर्दीच्या महामार्गावर ५० विद्यार्थ्यांसह बस सुरक्षितपणे थांबवली. नागरिकांनी नारायण राजू यांच्या या प्रसंगावधानाच्या निर्णयामुळे मोठा अपघात टळल्याचे सांगितले. जर त्यांनी बस वेळीच थांबवली नसती, तर अनेक विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.
विद्यार्थ्यांनी तातडीने हायवेवरील गस्त कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी राजू यांना रुग्णालयात दाखल केले. राजू यांच्या निधनामुळे परिसरातील नागरिकांनी आणि कॉलेज प्रशासनाने शोक व्यक्त केला असून, त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन दिले आहे.
तामिळनाडूतही अशीच घटना
या वर्षी मे महिन्यात तामिळनाडूतही अशीच एक घटना घडली होती. दिंडुक्कल येथील प्रभू नावाच्या बस चालकाला गाडी चालवत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. प्रभू यांनी बेशुद्ध पडण्यापूर्वी कंडक्टरला इशारा केला होता. कंडक्टरने तातडीने आपत्कालीन ब्रेक दाबून बस थांबवली, ज्यामुळे एक मोठा अपघात टळला. प्रभू यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमध्ये, चालकांनी मृत्यूशी झुंज देत असतानाही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले आणि अनेक लोकांचे प्राण वाचवले.