VIDEO: फायटर जेट इजेक्शन सीटची हाय-स्पीड चाचणी यशस्वी; 'तेजस'सह सर्व स्वदेशी विमानांची सुरक्षा वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:12 IST2025-12-03T13:53:40+5:302025-12-03T14:12:11+5:30
डीआरडीओची लढाऊ विमानाच्या आपत्कालीन बचाव प्रणालीची हाय-स्पीड रॉकेट स्लेड चाचणी यशस्वी झाली.

VIDEO: फायटर जेट इजेक्शन सीटची हाय-स्पीड चाचणी यशस्वी; 'तेजस'सह सर्व स्वदेशी विमानांची सुरक्षा वाढली
DRDO Fighter Jet Pilot Ejection Test: भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने संरक्षण क्षेत्रात नवा विक्रम स्थापित केला आहे. लढाऊ विमानांसाठी विकसित केलेल्या स्वदेशी इमर्जन्सी एस्केप सिस्टिम हाय-स्पीड रॉकेट स्लेड चाचणी यशस्वी झाली आहे. चंदीगढ येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीमधील रेल ट्रॅक रॉकेट स्लेड फॅसिलिटीवर हा महत्त्वपूर्ण प्रयोग पार पडला. या अभूतपूर्व यशामुळे, भारत आता स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा अत्यंत गुंतागुंतीच्या बचाव यंत्रणेची चाचणी करण्याची क्षमता असलेल्या जगातील मोजक्या देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.
८०० किमी/तास वेगावर अचूक यश
लढाऊ विमान ताशी ८०० किलोमीटर वेगाने हवेत उडत असताना निर्माण होणाऱ्या परिस्थिती निर्माण करत ही चाचणी घेण्यात आली. तेजस लढाऊ विमानाचा पुढील भाग दोन रॉकेट स्लेडवर ठेवून रॉकेट मोटर्सच्या साह्याने अचूक वेग प्राप्त करण्यात आला. या चाचणी दरम्यान कॉकपिटचे कॅनोपी (काच) सुरक्षितपणे तुटले, सीट यशस्वीरित्या बाहेर फेकली गेली आणि डमी पायलट पॅराशूटच्या मदतीने पूर्णपणे सुरक्षितपणे खाली उतरला. काच तुटणे, सीट बाहेर पडणे आणि पायलटची सुरक्षित रिकव्हरी या सर्व टप्प्यांमध्ये डीआरडीओला १०० टक्के यश मिळाले. ही चाचणी अधिक गुंतागुंतीची मानली जात होती.
सध्या भारताच्या बहुतेक लढाऊ विमानांमध्ये मार्टिन-बेकरसारख्या परदेशी कंपन्यांनी बनवलेल्या इजेक्शन सीट्स वापरल्या जातात. डीआरडीओच्या या यशामुळे, देशाला पायलट इजेक्शन सीटसाठी विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागणार नाही. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी या उपलब्धीबद्दल संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, हे तंत्रज्ञान तेजस आणि आगामी एएमसीए सारख्या स्वदेशी लढाऊ विमानांच्या सुरक्षिततेसाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
🚨 BIG BREAKING
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) December 2, 2025
DRDO successfully conducts a HIGH-SPEED rocket-sled test for a FIGHTER aircraft escape system 🔥 pic.twitter.com/Ggg8P1m1pf
भारत आता अमेरिका, रशियाच्या पंक्तीत
यापूर्वी जगातील अमेरिका, रशिया आणि फ्रान्ससारखे काही मोजकेच देश इतक्या वेगवान इजेक्शन चाचण्या करू शकत होते. या चाचणीमुळे आता भारतही त्या निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे. अशा चाचणीतूनच प्रत्यक्ष उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड किंवा क्रॅश झाल्यास पायलटचा जीव वाचू शकणार आहे.
संरक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या ऐतिहासिक यशामुळे डीआरडीओ, भारतीय वायुसेना, वैमानिकी विकास एजन्सी आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे अभिनंदन केले. त्यांनी याला 'आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेसाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.