तामिळनाडूमध्ये दोन बसची समोरासमोर धडक, ६ जणांचा मृत्यू ३० जखमी; कटर, जेसीबीने बाहेर काढले प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 14:20 IST2025-11-24T14:20:19+5:302025-11-24T14:20:57+5:30
तमिळनाडूमध्ये झालेल्या भीषण अपघाता सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

तामिळनाडूमध्ये दोन बसची समोरासमोर धडक, ६ जणांचा मृत्यू ३० जखमी; कटर, जेसीबीने बाहेर काढले प्रवासी
Tamil Nadu Bus Accident: तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोन खासगी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, ३० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदुरैहून सेनकोट्टईकडे जाणारी एक खासगी बस आणि तेनकासीहून कोविलपट्टीकडे जाणारी दुसरी बस यांच्यात ही टक्कर झाली. अपघात झाला तेव्हा दोन्ही बसमध्ये मिळून किमान ५५ लोक प्रवास करत होते.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मदुरैहून सेनकोट्टईकडे जाणाऱ्या बसच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि अति वेगामुळे हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.
कटर आणि जेसीबीच्या मदतीने बचावकार्य
अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आणि अनेक प्रवासी बसमध्ये अडकले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकारी, अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि कटरचा वापर करून बसचे नुकसान झालेले भाग कापून काढावे लागले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी २५ हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली
उत्तराखंडमधील टिहरी येथे प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १७ हून अधिक जण जखमी झाले आहेत, त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. बसमध्ये २९ हून अधिक लोक होते. एसडीआरएफ आणि रस्त्यावरून जाणारे लोक मदतीसाठी पोहोचले आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन एसडीआरएफच्या आणखी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत. बस ७० मीटर खोल दरीत कोसळली.