Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार, पण एक अट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 07:14 IST2025-11-19T07:13:11+5:302025-11-19T07:14:51+5:30
Agricultural Insurance Scheme: वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांनी होणारे पीक नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कव्हर केले जाणार आहे.

Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार, पण एक अट!
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांनी होणारे पीक नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कव्हर केले जाणार आहे. हे नुकसान २०२६ च्या खरीप हंगामापासून मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मुसळधार पाऊस व पुरामुळे भात पिके पाण्याखाली गेल्यास झालेले नुकसानही विमा योजनेअंतर्गत कव्हर केले जाईल.
कोण करते नुकसान? भारतातील शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्ती, रानडुक्कर, नीलगाय, हरीण आणि माकडे यांसारख्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होते. आता या नुकसानीला स्थानिक जोखीम श्रेणी अंतर्गत पाचवा अतिरिक्त विमा कव्हर म्हणून ओळखले जाईल. त्याचा लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
या विम्यामुळे ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांच्या दाव्यांचा तत्काळ निपटारा होईल.
शेतकऱ्यांना ७२ तासांत हे मात्र करावे लागणार...
राज्य सरकारांना नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या वन्य प्राण्यांची यादी जाहीर करणे, तसेच आधीच्या डेटाच्या आधारे असुरक्षित जिल्हे ओळखावे लागतील. शेतकऱ्यांना जिओटॅग केलेले छायाचित्र अपलोड करून पीक विमा ॲप वापरून ७२ तासांच्या आत नुकसान नोंदवावे लागेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. अनेक राज्यांनी या विम्याची मागणी केली होती.