"१५-२० वर्षाच्या मुली एका वर्षाची मुलं घेऊन बसल्या आहेत"; आनंदीबेन यांचे लिव्ह-इन रिलेशनशिपवर परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:57 IST2025-10-08T19:18:52+5:302025-10-08T19:57:57+5:30
लिव्ह इन रिलेशनवर भाष्य करताना उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी विद्यार्थिनींना सल्ला दिला.

"१५-२० वर्षाच्या मुली एका वर्षाची मुलं घेऊन बसल्या आहेत"; आनंदीबेन यांचे लिव्ह-इन रिलेशनशिपवर परखड मत
UP Governor Anandiben Patel on Live in Relationship:उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी वाराणसी येथील एका कार्यक्रमात लिव्ह-इन रिलेशनशिपवर एक मोठे विधान केले. विद्यार्थींनींना संबोधित करताना लिव्ह-इन रिलेशनशिप समाजासाठी चांगले नाही आणि यामुळे असंख्य कायदेशीर आणि सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचे आनंदी बेन पटेल म्हणाल्या. अशा संबंधांमुळे महिला अनेकदा हिंसाचार आणि मानसिक छळाला बळी पडत असल्याचेही आनंदी बेन पटेल म्हणाल्या.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी बलिया येथील जननायक चंद्रशेखर विद्यापीठाच्या सातव्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती लावली होती. समारंभात त्यांनी तरुणांना ड्रग्ज आणि व्यसन सोडण्याचे आवाहन केले. तरुण व्यसनापासून दूर गेला तर ते माझ्यासाठी एखाद्या पदकापेक्षा कमी नसेल, असे आनंदी बेन म्हणाल्या. त्यांनी विद्यार्थींनींना लिव्ह-इन रिलेशनशिप ही आपली संस्कृती नाही असं सांगत अशा वाईट सवयी टाळण्याचे आवाहन केले.
"माझा मुलींसाठी एकच सल्ला आहे. कोणीही तुमच्याकडे मैत्री करण्यासाठी येईल आणि आजकाल लिव्ह-इन रिलेशनशिप सामान्य आहेत. काय आहे हे लिव्ह-इन रिलेशनशिप? अनाथाश्रमात जा आणि लिव्ह-इन रिलेशनशिपचे परिणाम पहा. १५ आणि २० वर्षांच्या मुली तिथे एक वर्षाच्या मुलांसोबत उभ्या आहेत. आज २००-२०० मुली खोल्यांमध्ये बंद आहेत. मी अनेक दुःखद घटना पाहिल्या आहेत. मी लोकांना ५० तुकडे करून बीममध्ये भरलेले पाहिले आहे. हे ऐकून मला खूप वाईट वाटते. समाजाने या प्रकरणांपासून धडा घेतला पाहिजे आणि तरुण पिढीने हे समजून घेतले पाहिजे की असे संबंध नैतिकदृष्ट्या योग्य किंवा सुरक्षित नाहीत," असं आनंदी बेन पटेल म्हणाल्या.
"तरुण ड्रग्ज घेतात आणि भारत सरकार भारत ड्रग्जमुक्त करण्यासाठी मोहीम राबवत आहे. हे आमचे नशीब आहे. आमचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ड्रग्जमुक्त मोहीम सुरू केली आहे. तुम्ही ड्रग्ज आणि व्यसन सोडा. हेच आमच्यासाठी एक पदक असेल. तरच ड्रग्जमुक्त भारताचे आमचे स्वप्न पूर्ण होईल. महाविद्यालयीन आणि विद्यापीठांच्या वसतिगृहांमध्ये ड्रग्जचा शोध हा चिंतेचा विषय आहे. तरुणांनी राष्ट्र उभारणीसाठी स्वतःला समर्पित करायला हवं," असेही आनंदी बेन पटेल म्हणाल्या.