दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:54 IST2025-09-16T15:51:42+5:302025-09-16T15:54:47+5:30
Uttar Pradesh Crime News: सारसी सुनांचा होणारा छळ, त्यांना होणारा त्रास याबाबत तुम्ही बातम्यांमधून अनेकदा ऐकलं असेल. पण उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यातील कटघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्क एका सुनेने गुंडांना सोबत घेऊन येत सासरी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...
सारसी सुनांचा होणारा छळ, त्यांना होणारा त्रास याबाबत तुम्ही बातम्यांमधून अनेकदा ऐकलं असेल. पण उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यातील कटघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्क एका सुनेने गुंडांना सोबत घेऊन येत सासरी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सबिया खान असं या सूनेचं नाव असून, ती दोन गुंडांना सोबत घेऊन आली. तिने एखाद्या गुंडाप्रमाणे घराच्या दरवाजावर उभं राहून गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तसेच तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत म्हटलं आहे की, त्याचं लग्न २०२० मध्ये बिजनौर येथील सबिया खान हिच्याशी झालं होतं. लग्नानंतर काही काळातच मतभेद झाल्याने सबिया ही माहेरी निघून गेली. तसेच तडजोड म्हणून सबिया हिने मोठी रक्कम उकळली होती. तसेच वारंवार पैसे मागून ती कुटुंबीयांना ब्लॅकमेल करत होती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास सबिया खान तिचा भाऊ अयान आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने फरमानच्या घरी पोहोचली. बुरखा घातलेली सबिया शिविगाळ करत होती. तर तिच्यासोबत आलेले गुंड दरवाजा मोठमोठ्याने वाजवत होते. त्यानंतर त्यांनी हातातील बंदूक घेऊन गोळीबार केला. ताय फरमान याचा भाऊ फैजान हा थोडक्यात वाचला. सबिया आणि तिच्यासोबतच्या गुंडांनी केलेल्या गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली.
या प्रकरणी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पीडितांनी दिलेली तक्रार आणि व्हायरल व्हिडीओंना पुरावा मानत पोलिसांनी सबिया खान आणि तिच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांचा शोध सुरू असून, त्यांची लवकरच तुरुंगात रवानगी केली जाईल.