कुत्रे घाबरट माणसाला ओळखतात, मग चावतात; सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण, नियम पाळण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 11:31 IST2026-01-09T11:30:14+5:302026-01-09T11:31:02+5:30
आमचे निर्देश होते ते रस्त्यांवरील प्रत्येक कुत्रा हटवण्याचे निर्देश नव्हते, असे स्पष्टीकरण गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

कुत्रे घाबरट माणसाला ओळखतात, मग चावतात; सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण, नियम पाळण्याचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जे लोक कुत्र्यांना घाबरतात किंवा ज्यांना पूर्वी कुत्र्याने चावले आहे, अशा व्यक्तींचा वास कुत्रे ओळखू शकतात आणि मग ते त्यांच्यावर हल्ले करतात असे एक निरीक्षण गुरुवारी न्यायालयाने नोंदवले. भटक्या कुत्रांना दिली जाणारी वागणूक ही ‘प्राणी जन्म नियंत्रण’ नियमांनुसार द्यावीत, असे आमचे निर्देश होते ते रस्त्यांवरील प्रत्येक कुत्रा हटवण्याचे निर्देश नव्हते, असे स्पष्टीकरण गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.
भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, देशभरातील श्वानप्रेमींनी जुन्या आदेशांमध्ये बदल करावेत, अशी मागणी केली आहे. त्यावर गुरुवारी अडीच तास सुनावणी झाली. यात कुत्र्यांचे वर्तन, कुत्र्यांच्या निवाऱ्याची कमतरता आणि सरकारी नियमांची अंमलबजावणी यावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली.
या सुनावणीत पाळीव कुत्र्यांचा मालक असतो, मात्र भटक्या कुत्र्यांचा मालक कोणीही नसतो. राज्यांची जबाबदारी लसीकरण व नियंत्रणापुरती आहे, असा मुद्दा मांडण्यात आला.
न्यायालयात काय झाले?
सुनावणीदरम्यान न्या. नाथ यांनी सांगितले की, कुत्रे माणसाची भीती ओळखतात आणि त्यामुळे चावा घेतात. यावर कुत्र्यांच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या एका वकिलाने आक्षेप घेतला. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, डोके हलवू नका. मी वैयक्तिक अनुभव सांगतो आहे.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की, राज्य सरकारांनी दिलेल्या आकडेवारीत नगरपालिकांकडून चालवण्यात येणाऱ्या निवारा केंद्रांची माहिती नाही. देशात सध्या केवळ पाच सरकारी केंद्र असून, प्रत्येक केंद्राची क्षमता १०० कुत्र्यांचीच आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘प्राणी मित्रां’चे वकील सी. यू. सिंग यांनी कुत्र्यांना हटवण्यास विरोध केला. कुत्रे हटवले तर उंदरांची संख्या वाढेल, असा दावा त्यांनी केला. यावर न्यायालयाने मिश्कीलपणे विचारले, मग मांजरी आणायच्या का?