भुज : ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. आतापर्यंत जे झाले तो फक्त ट्रेलर होता. गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू. त्यामुळे पाकिस्तानने यापुढे कोणतीही आगळीक करू नये असाही इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी दिला. ते म्हणाले की, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) मिळणाऱ्या एक अब्ज डॉलरच्या मदतीचा वापर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या दहशतवादासाठी होऊ शकतो. हा मुद्दा लक्षात घेऊन आयएमफने पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यासंदर्भात फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
राजनाथसिंह यांनी शुक्रवारी केलेल्या भूजच्या दौऱ्यात तेथील सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला तसेच भारतीय हवाई दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावलेल्या कामगिरीचे कौतुक केले. त्यांनी भूज येथील लष्करी जवानांशी संवाद साधताना सांगितले की, भारत आयएमएफला निधी देतो. हा पैसा पाकिस्तानसारख्या देशांत दहशतवादी कृत्यांसाठी वापरला जाऊ नये यासाठी दक्ष राहायला हवे. सध्याच्या काळात पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देणे हे दहशतवादाला मदत करण्यासारखेच आहे. पाकिस्तानला भविष्यात कोणतीही मदत देणे आयएमएफने टाळायला हवे. भारताने नष्ट केलेल्या दहशतवादी तळांची पुनर्बांधणी करण्याचे काम पाकने हाती घेतले आहे, असे ते म्हणाले.
‘भारताने पाकिस्तानला ठेवले प्रोबेशनवर’
राजनाथसिंह म्हणाले की, एखाद्या गुन्हेगाराचं वर्तन सुधारावे म्हणून न्यायाधीश त्याला ‘प्रोबेशन’वर ठेवतो. जर त्या काळात त्याने काही गुन्हा केला तर त्याला कठोर शिक्षा दिली जाते. तसेच सध्या भारताने पाकला शस्त्रसंधीतून प्रोबेशनवर ठेवलं आहे. त्या देशाचे वर्तन सुधारले तर ठीक आहे, पण जर पुन्हा काही आगळीक घडली तर त्याला अतिशय कठोर शिक्षा दिली जाईल. पाक लष्कर व दहशतवादी संघटना यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे तेथील अण्वस्त्रे भविष्यात दहशतवाद्यांच्या हाती पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे भारतासह काही देशांना वाटते.
दहशतवादी तळांसाठी पाकिस्तानचा पैसा
पाकिस्तानने भूजमधील हवाई तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला. त्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने केवळ शत्रूवर मातच केली नाही तर त्यांची अनेक महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त केली. मुरिदके आणि बहावलपूर येथील लष्कर-ए-तय्यबा व जैश-ए-मोहम्मदचे भारताने उद्ध्वस्त केलेले तळ पुन्हा उभारण्यासाठी पाकिस्तान सरकारने निधीही जाहीर केला आहे.
पीओके ताब्यात घेताना अतिशय नियोजनबद्धरीत्या युद्ध करावे लागेल : भट्ट
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आधुनिक युद्धशास्त्रामध्ये ड्रोनचे असलेले महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. ड्रोन, स्पेस, सायबर स्पेस या गोष्टींमुळे भविष्यातील युद्धांना नवीन आयाम मिळेल, असे भारतीय लष्कराचे माजी लष्करी संचालन महासंचालक (डीजीएमओ) निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिलकुमार भट्ट यांनी म्हटले आहे. चीनबरोबर डोकलाम येथे झालेल्या संघर्षाच्या काळात ते डीजीएमओ होते. कोणतीही समस्या सोडवताना युद्ध हा सर्वात शेवटचा पर्याय असावा. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अतिशय नियोजनबद्धरीत्या युद्ध करावे लागेल.
उपग्रह सुरक्षित ठेवावे लागतील
जर परिस्थिती आणखी चिघळली असती तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पावले उचलली जाण्याची शक्यता होती. अवकाश हे क्षेत्र आता गुप्तचर यंत्रणेकरिता तसेच टेहळणीसाठी तसेच क्षेपणास्त्रांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. भविष्यात प्रत्येक देशाला आपले उपग्रह सुरक्षित ठेवावे लागतील व प्रतिस्पर्ध्यांचे उपग्रह कोणते? यावर लक्ष ठेवावे लागेल, असे ते म्हणाले.