भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:34 IST2025-08-09T11:34:00+5:302025-08-09T11:34:48+5:30
भाजपाने याआधीच चिराग पासवान यांना संयम ठेवायला सांगितला आहे. परंतु यावेळी वरिष्ठ नेते स्पष्ट संदेश देण्याची तयारी करत आहेत.

भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएच्या २ घटक पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी अलीकडेच जेडीपीचे नितीश कुमार यांच्याविरोधात विधान केले होते. बिहारमधील कायदा सुव्यवस्थेवर टीकास्त्र करत चिराग पासवान यांनी नितीश कुमार सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले. पासवान यांच्या विधानावर भाजपा श्रेष्ठी नाराज आहेत.
सूत्रांनुसार, भाजपा लवकरच चिराग पासवान यांच्यासोबत बंद दाराआड बैठक घेणार आहे. त्यात आघाडीची एकजूट ठेवणे आणि निवडणुकीपूर्वी नेतृत्वाबाबत स्पष्ट संदेश दिले जातील. बिहारमध्ये एनडीएचा चेहरा नितीश कुमारच असतील आणि त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली जाईल असं भाजपाने स्पष्ट केले आहे. चिराग पासवान यांच्या विधानांमुळे महाआघाडीविरोधात एनडीएच्या एकीला धक्का पोहचण्याची भाजपाला चिंता सतावत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच बिहारमधील रॅलीत मजबूत एनडीएचा संदेश दिला आहे. त्यात चिराग पासवान यांच्या टीकेमुळे नुकसान होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत पक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चिराग पासवान अशी विधाने करत आहेत. परंतु त्यामुळे एनडीएबाबत गैरसमज निर्माण होत आहेत. एलजेपी, जेडीयू आणि भाजपा एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत आहेत असं भाजपातील सूत्रांनी सांगितले आहे. भाजपाने याआधीच चिराग पासवान यांना संयम ठेवायला सांगितला आहे. परंतु यावेळी वरिष्ठ नेते स्पष्ट संदेश देण्याची तयारी करत आहेत. बिहारमध्ये एनडीएविरुद्ध महाआघाडी असा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे आघाडी मजबूत आणि एकच आवाज हा रणनीतीचा महत्त्वाचा भाग आहे असं सांगितले जाते.
२४३ जागांवर लढण्याचं प्लॅनिंग
दरम्यान, एनडीएने २४३ जागांवर लढण्याचं प्लॅनिंग केले आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला निवडणुकीचं वेळापत्रक निश्चित झाल्यावर जाहीर केले जाईल. परंतु तिकिट वाटपामुळे काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चिराग पासवान हे दुधारी तलवार असल्याचं बोलले जाते. नितीश कुमार यांच्यावर टीका करून ते पासवान मते एकत्र ठेवू इच्छितात तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. रामविलास पासवान यांच्या काळातही एलजेपी आणि जेडीयू यांचे फार सौख्य राहिले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाला या दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागत आहे.