BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 14:00 IST2025-12-28T13:55:10+5:302025-12-28T14:00:43+5:30
Congress Digvijay Singh News: भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संघटनशक्तीची प्रशंसा करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी खळबळ उडवून दिली.

BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Congress Digvijay Singh News: भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संघटनशक्तीची काँग्रेस पक्ष कार्यकारिणी बैठकीच्या आधी प्रशंसा करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी खळबळ उडवून दिली. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी खुर्चीवर बसलेले व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यापुढे जमिनीवर बसलेले, असे एक जुने छायाचित्रही दिग्विजय सिंह यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केले. यानंतर काँग्रेस पक्षात यावरून दोन गट पडले असून, काँग्रेसमधील काही नेते याचे समर्थन करत असून, काही नेते टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दिग्विजय सिंह यांनी अपलोड केलेल्या छायाचित्रासोबतच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रा. स्व. संघाचा तळागाळातील एक स्वयंसेवक व जनसंघ–भाजपचा कार्यकर्ता नेत्यांच्या पायांशी जमिनीवर बसत होता. त्यानंतर भविष्यात तो राज्याचा मुख्यमंत्री व देशाचा पंतप्रधान झाला. हीच संघटनेची शक्ती आहे. RSSच्या संघटनात्मक ताकदीचे दिग्विजय सिंह यांनी केलेल्या कौतुकामुळे काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. काही नेत्यांनी त्यांच्या विधानाचा तीव्र विरोध केला आहे आणि आरएसएसकडून कोणताही धडा घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तर काही जण वैचारिक मतभेद असूनही त्यांच्या कार्य नीतीतून शिकण्याचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
...तर ते भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करण्यासारखे
परराष्ट्र धोरण हे भारताचे आहे, कोणत्या पक्षाचे नाही. राजकारणात कुणी याबाबत पंतप्रधानांच्या पराभवावर आनंद व्यक्त करीत असेल तर ते भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करण्यासारखे आहे, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटले. तर, पोस्टबाबत चर्चा सुरू होताच दिग्विजय सिंह म्हणाले की, मी भाजप, रा. स्व. संघाच्या धोरणांचा कट्टर विरोधक आहे. मात्र, या दोघांच्या फक्त संघटनशक्तीची मी तारीफ केली.
आरएसएसकडून शिकण्यासारखे काहीच नाही
काँग्रेस नेते पवन खेडा यांनी कठोर भूमिका घेतली. ते म्हणाले की, आरएसएसकडून शिकण्यासारखे काहीच नाही. गोडसे म्हणून ओळखली जाणारी संघटना गांधींनी स्थापन केलेल्या संघटनेला काय शिकवू शकते? गांधीजींनी स्थापन केलेल्या काँग्रेससारख्या संघटनेला अशा संघटनेकडून कोणताही धडा घेण्याची गरज नाही यावर त्यांनी भर दिला. तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, भाजप त्यांच्या विधानांचा विपर्यास करत आहे. आम्हाला आरएसएसकडून काहीही शिकण्याची गरज नाही; आम्ही ब्रिटिश राजवटीविरुद्ध आणि त्यांच्या अन्यायाविरुद्ध स्वातंत्र्य लढा दिला आणि त्याचे जनआंदोलनात रूपांतर केले, म्हणून आम्हाला कोणाकडूनही काहीही शिकण्याची गरज नाही; उलट, लोकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून शिकले पाहिजे.